Cancer Risk : भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज !
नवी देहली – कर्करोग हे जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. प्रतिवर्षी लाखो लोक कर्करोगामुळे मरतात. वर्ष २०५० पर्यंत ही आकडेवारी झपाट्याने वाढेल, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. कर्करोगाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२२ मध्ये जगभरात कर्करोगाचे अंदाजे दोन कोटी नवीन प्रकरणांचे निदान केले गेले. त्यांतील ९७ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. वर्ष २०५० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्ष ३ कोटी ५० लाखांपर्यंत पोचू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. गेल्या दशकातील आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारतातही या गंभीर आणि जीवघेण्या आजाराची प्रकरणे वर्षानुवर्षे झपाट्याने वाढत आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की, या दशकाच्या अखेरीस देशातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये १२ टक्के वाढ अपेक्षित आहे.
१. तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र यातील नवनवीन शोधांमुळे कर्करोग हा आता असाध्य रोग राहिला नसला, तरीही वैद्यकीय खर्चामुळे कर्करोगावरील उपचार सामान्य लोकांपर्यंत पोचणे कठीण आहे.
२. नुकत्याच घोषित झालेल्या असंसर्गजन्य आजारांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, देशात ज्या पातळीवर कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, ते नक्कीच चिंताजनक आहे.
३. वर्ष २०२० मध्ये भारतात १२ लाख कर्करोगाची प्रकरणे समोर आली. त्यांपैकी ९ लाख ३० सहस्र रुग्णांना यात जीव गमवावा लागला.
४. भारतात स्तन आणि गर्भाशय यांचा कर्करोग ही महिलांमध्ये सर्वांत सामान्य प्रकरणे आहेत, तर पुरुषांना फुफ्फुस, तोंड आणि प्रोस्टेट कर्करोगाचा सर्वाधिक धोका असतो.
५. बहुतेक रुग्णांमध्ये कर्करोगाचे शेवटच्या टप्प्यात निदान होते. यामुळे रुग्णावर उपचार करणे खूप कठीण होते.