सनातन संस्थेच्या पायाभरणीत अतुलनीय योगदान देणारे निष्ठावान साधक : आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे) !
उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २६ वर्षे राहून पूर्णवेळ साधना करणारे आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे सहसाधक अधिवक्ता योगेश जलतारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
डॉ. दुर्गेश सामंत यांच्यात अनेक अप्रतिम वैशिष्ट्ये आहेत, हे मला आज योगेश जलतारे यांच्या या लेखामुळे कळले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘कुठलेही कार्य ईश्वराची इच्छा आणि त्याची कृपा यांमुळेच उभे रहाते’, यात शंका नाही; परंतु हे कार्य स्थुलातून पुढे नेण्यासाठी ईश्वर काही जणांची निवड करतो आणि त्यांच्या माध्यमातून कार्य करून घेतो. भगवंत त्यांच्यातील गुणांच्या आधारेच त्यांची निवड करत असणार, हे नक्की ! सनातन संस्थेची एकूण उभारणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि त्यांनी स्वतः अन् काही साधकांनी घेतलेल्या पराकोटीच्या कष्टातून झाली आहे. या काही साधकांत महत्त्वाचे आणि अतुलनीय योगदान असलेले एक साधक, म्हणजे आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत !
माझी आणि दुर्गेशदादा यांची पहिली भेट वर्ष १९९९ मध्ये दोनापावला (गोवा) येथे त्या वेळी असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात झाली. तेव्हा दैनिक चालू झाले नव्हते. ते चालू करण्याचा सराव चालू होता. मधल्या काही वर्षांच्या कालखंडात अधूनमधून आणि साधारण वर्ष २००८ नंतर आम्ही समवेतच सेवा करत आहोत. या कालावधीत माझ्या लक्षात आलेली डॉ. दुर्गेशदादांची वैशिष्ट्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. वरकरणी अलिप्त; परंतु तितकेच मोकळे व्यक्तीमत्त्व !
तुम्ही कधी रामनाथी आश्रमात आलात, तर एखाद्या पटलावर खाली मान घालून कुठल्या तरी चिंतनात मग्न आणि अलिप्त भासणारे साधक दिसले, तर ‘ते डॉ. दुर्गेशदादा आहेत’, असे हमखास ओळखू शकता. त्यामुळे सकृतदर्शनी आपल्याला त्यांच्याशी बोलायला भीड वाटत असली, तरी आवर्जून बोला. आपल्या लक्षात येईल की, ते इतके मोकळेपणाने आणि मनापासून हसून प्रतिसाद देतात की, ‘क्षणभरापूर्वी पाहिलेले दुर्गेशदादा हेच आहेत का ?’, असा प्रश्न आपल्याला पडेल. एकदा का आपला त्यांच्याशी परिचय झाला की, त्यांची गुणवैशिष्ट्ये सहजतेने आपल्या लक्षात येऊ लागतात. त्यांच्याशी संवाद साधल्यावर आपल्या लक्षात येते की, ते हातचे राखून काही बोलत नाहीत. आत-बाहेर काही न ठेवता ते समरस होऊन आपल्याशी बोलतात.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत रहाणे
दुर्गेशदादांना प.पू. भक्तराज महाराज यांचा सत्संग लाभला. प.पू. भक्तराज महाराज यांनी दादांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह रहायला सांगितले. तेव्हा दादांनी मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय बंद केला आणि तेव्हापासून आजतागायत ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत आहेत. मागची ५ – ६ वर्षे सोडली, तर दादांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी क्वचितच वेळ दिला आहे. आरंभीपासूनच ते घरी गेल्यावरही सतत सेवारत रहातात. त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा त्यांना चांगली साथ दिली, यात शंका नाही. हे सर्व करत असतांना प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येतात, तसे दादांच्या जीवनातही बरेच कठीण प्रसंग आले; परंतु त्यांनी तंतोतंत गुर्वाज्ञापालन केले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची साथ सोडली नाही.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बीजरूपात करायला सांगितलेल्या सेवा नावारूपास आणणे
दुर्गेशदादांची कुशाग्र बुद्धीमत्ता हेरून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना विविध प्रकारच्या नवनवीन सेवा बीजरूपात प्रथम करायला दिल्या आणि दुर्गेशदादांनी त्यांचा सखोल अभ्यास, चिंतन अन् मनन करून त्या सेवांसंबंधी कार्यपद्धती ठरवून त्या सेवा नावारूपास आणल्या. यांमध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा, अध्यात्मप्रसार, ग्रंथनिर्मिती, प्रसारसाहित्य, ध्वनी-चित्रीकरण, निवेदन, दृक्-श्राव्य सत्संगांची निर्मिती इत्यादी विविध विषय त्यांनी लीलया हाताळले आहेत. केवळ सेवा करणेच नव्हे, तर त्या सेवांशी संबंधित व्यवस्थापकीय भागही परात्पर गुरु डॉक्टर दुर्गेशदादांना अभ्यासायला सांगत.
(क्रमशः)
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२३)