पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केल्यास भारताचीच होणार हानी ! – पाकचे परराष्ट्र व्यवहार तज्ञ
पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार मारण्याच्या राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचे प्रकरण
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ६ एप्रिल या दिवशी म्हटले की, भारत पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचा शोध घेईल आणि त्यांना ठार करील. त्यांच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा होत आहे. पाकचे परराष्ट्र व्यवहार तज्ञ साजिद तरार यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्ये केली आहेत. ते म्हणाले की, घुसखोरी करून आणि आतंकवाद्यांना मारून भारताची हानीच होईल. पाकचे काहीही होणार नाही. पाककडे असे काय आहे, जे तुम्ही (भारत) नष्ट कराल ? भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व हवे आहे. त्यामुळे अशी कृत्यांमुळे तुमचीच हानी होईल.
साजिद तरार पुढे म्हणाले की,
१. जगाला पाकशी संबंध ठेवायचे नाहीत !
भारताने काश्मीरच्या विकासाचे संपूर्ण कंत्राट संयुक्त अरब अमिरातकडे दिले आहे. पाक संयुक्त अरब अमिरातकडेच पैसे मागतो. आता पंतप्रधान शाहबाझ शरीफ सौदी अरेबियाला गेले असले, तरी जगाला आमच्याशी संबंध ठेवायचे नाहीत.
२. सौदी अरेबिया भारताकडे एक उदयोन्मुख शक्ती म्हणून पहातो !
पाकिस्तानात पंतप्रधान किंवा सैन्यदलप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची पहिली भेट सौदी अरेबियाची असते, अशी परंपरा आहे. आता मात्र काळ पालटला आहे. सौदी अरेबिया आता पाकिस्तानपेक्षा भारताशी चांगले संबंध ठेवत आहे; कारण तो भारताकडे एक उदयोन्मुख शक्ती म्हणून पहातो.
३. आंतरराष्ट्रीय वादात न अडकल्यामुळेच चीनची प्रगती !
निवडणुकीचा काळ असल्याने भारताने असे वक्तव्य केलेले असले, तरी यामुळे भारताचीच हानी होईल. याचे कारण ‘टेस्ला’सारखी आस्थापने भारतात येत आहेत. जग तेथे गुंतवणूक करत आहे. अशा स्थितीत अशा विधानांमुळे भारताची हानी होईल. संघर्ष झाला, तर लोक गुंतवणू केलेले पैसे काढून घेतील. भारताचे शेजारी चीनकडे सरकत आहेत आणि पाश्चात्त्य देश त्याच्यापासून दूर जात आहेत. तुमचा (भारताचा) खरा शत्रू चीन आहे. आंतरराष्ट्रीय वादात न अडकल्यामुळेच चीनची प्रगती झाली आहे.