इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात ५० ठिकाणी सहस्रो लोकांचे आंदोलन
इस्रायली ओलिसांची सुटका, तसेच नेतान्याहू यांच्या त्यागपत्राची मागणी !
तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. ६ एप्रिल या दिवशी तेल अवीवसह ५० ठिकाणी सहस्रो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलकांनी हमासच्या कह्यात असणार्या इस्रायली ओलिसांची सुटका, नेतान्याहू यांचे त्यागपत्र आणि देशात लवकर निवडणुका घेण्याची मागणी केली.
१. तेल अवीवमध्ये निदर्शनाच्या वेळी पोलीस आणि निदर्शक यांच्यामध्ये चकमकही झाली. या वेळी एका चारचाकी वाहनाने काही आंदोलकांना चिरडले. यामध्ये ५ जण घायाळ झाले.
२. इस्रायलच्या सीझरिया शहरातील पंतप्रधान नेतान्याहू यांच्या खासगी घराबाहेरही लोकांनी मोर्चा काढला. आंदोलकांनी हातात घेतलेल्या फलकावर ‘इलाद, आम्हाला क्षमा करा’, असे लिहिले होते. जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.
३. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी आक्रमण करून २५३ लोकांना ओलीस ठेवले होते. त्यांपैकी सुमारे १३० इस्रायली नागरिक अजूनही हमासच्या बंदिवासात आहेत.
संपादकीय भूमिकाहमासला गेले ६ महिने प्रत्युत्तर दिले जात असतांनाही इस्रायल अद्याप ओलिसांची सुटका करू शकत नसल्याने देशभक्त जनतेचा उद्रेक काय असतो, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे ! |