‘मला श्री सिद्धिविनायकाला उत्तर द्यायचे आहे’, या भावाने मी सेवा केली ! – आदेश बांदेकर, माजी अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई
मंदिरातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात झालेल्या आरोपांवर उत्तर
मुंबई – मी अध्यात्म मानतो. आयुष्यात अनेक गोष्टी होत असतात; पण शेवटी श्री सिद्धिविनायकाला मला उत्तर द्यायचे आहे. मी साडेसहा वर्षे मंदिरात अध्यक्ष होतो आणि माझ्या नावाचे एकही ‘व्हाऊचर’ मंदिरात नाही. एक लाडू जरी घेतला, तरी मी त्याचे पैसे दिलेले आहेत. याविषयी सगळ्या नोंदी आहेत. त्या देवाला मला उत्तर द्यायचे आहे; म्हणून मी उत्तमप्रकारे काम करून त्याची सेवा केली. निष्ठेने काम केले म्हणून आनंदाने प्रवास चालू आहे, अजून काय पाहिजे ? असे वक्तव्य मुंबईतील प्रसिद्ध ‘श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट’चे माजी अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी केले. बांदेकर यांच्यावर मंदिरातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप झाले होते. २३ जून २०२३ पर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती होती. त्यांच्या जागी शिवसेनेने सदा सरवणकर यांची नियुक्ती केली आहे.
बांदेकर म्हणाले की, मंदिराच्या न्यास समितीमध्ये काम करतांना मला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. मी विधी आणि न्याय विभागाला पत्र पाठवले की, मी भत्ता घेणार नाही. त्याप्रमाणे मी तो घेतलाही नाही. मोठ्या देवस्थानांसाठी काम करायला मिळणे, ही आई-वडिलांची पुण्याई असते. मंदिरात भाविक दानपेटीत पैसे देतात, त्यांच्या एक-एक रुपयाचे मोल मोठे असते. मला सिद्धिविनायकाची सेवा करायला मिळाली, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे.