कुख्यात गुंड अरुण गवळी याची कारागृहातून सुटका होणार !

अरुण गवळी

मुंबई – कुख्यात गुंड अरुण गवळी याची कारागृहातून मुदतपूर्व सुटका केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अरुण गवळी याची सुटका करण्याचा आदेश ५ एप्रिल या दिवशी कारागृह प्रशासनाला दिला असून येत्या १ मासात याविषयीची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

वर्ष २००६ च्या शासन निर्णयानुसार ६५ वय झाल्यावर बंदीवानाला शिक्षेमध्ये सवलत देण्याचे प्रावधान आहे. या प्रावधानाच्या साहाय्याने शिक्षेत सवलत मिळावी, यासाठी अरुण गवळी याने न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली होती; मात्र न्यायालयाने याविषयीचा निर्णय राखून ठेवला होता. मुंबईचे नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्येप्रकरणी २ जन्मठेपेची शिक्षा तो भोगत आहे. अरुण गवळी याने यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढवली आहे. मुंबईतील भायखळा येथील दगडी चाळीमध्ये अरुण गवळी याचे वर्चस्व मानले जाते.