सासवड (जिल्हा पुणे) येथील मतदान यंत्र चोरी प्रकरणातील ३ अधिकार्यांचे निलंबन रहित !
‘महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणा’चा निर्णय
पुणे – पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र (कंट्रोल युनिट) चोरीला गेले होते. या प्रकरणी राज्य सरकारने पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डी. वाय.एस् पी.) तानाजी बरडे यांना निलंबित केले होते. या ३ अधिकार्यांनी ‘महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणा’मध्ये (‘मॅट’मध्ये) तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर ‘मॅट’ने निर्णय घेत त्या ३ अधिकार्यांचे निलंबन रहित केले आहे. त्यांना पुन्हा त्याच जागेवर नियुक्तीचे आदेश दिले आहेत. (असे असेल, तर मतदान यंत्राच्या चोरीला उत्तरदायी कोण ? – संपादक)
सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र (कंट्रोल युनिट) चोरीला गेल्याची घटना ५ फेब्रुवारी या दिवशी उघडकीस आली होती. निवडणुकीच्या महत्त्वाच्या कामांमध्ये कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या अधिकार्यांवर ठेवण्यात आला होता. त्यावरून ‘भारत निवडणूक आयोगा’ने संबंधित अधिकार्यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने या ३ अधिकार्यांना निलंबित केले होते.
संपादकीय भूमिका :निलंबन रहित होऊन कामावर रुजू झालेल्या अधिकार्यांनी पुन्हा मतदान यंत्रांची चोरी केली, तर त्याला उत्तरदायी कोण ? |