पोलिसांच्या अन्वेषणात एवढा विलंब का ? – सात्यकी सावरकर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण !
पुणे – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण केले जात आहे; परंतु या अन्वेषणात विलंब होत असल्याची तक्रार सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केली आहे. ‘पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का ? पोलीस यंत्रणा, सरकार आणि संबंधित अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे’, असे सात्यकी सावरकर यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. या प्रकरणी न्यायालयाने २७ मेपर्यंत संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
नेमके प्रकरण काय आहे ?
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर भाषण केले होते. भाषणात गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात मानहानीप्रकरणी फौजदारी दावा प्रविष्ट केला आहे. याविषयी सात्यकी यांनी सर्व पुरावे आणि साक्षीदार न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात सत्यता निदर्शनास आल्यानंतर, तसेच आरोपी न्यायालयीन कक्षेच्या बाहेर वास्तव्यास असल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी संबंधित पोलीस ठाण्याला फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ अन्वये सखोल अन्वेषण करण्याचे आदेश दिले होते. तक्रारीसोबतच सात्यकी यांनी पुरावा म्हणून काही बातम्या, तसेच गांधींच्या लंडनमधील भाषणाच्या व्हिडिओची यूट्यूब लिंकही सादर केली होती. संबंधित पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरली होती.