दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा !; संजय निरूपम शिवसेनेत जाण्याची शक्यता !…
गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा !
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा ‘टीझर’ (विज्ञापन) प्रसारित करण्यात आला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचे आमंत्रण यात देण्यात आले आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ‘युती का फिस्कटली ?’, ते सांगतील किंवा स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे सांगतील. त्यांचा उमेदवार निवडून आला, तर ते महायुतीला पाठिंबाही देऊ शकतात. त्यांनी दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डी या जागांची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.
संजय निरूपम शिवसेनेत जाण्याची शक्यता !
मुंबई – काँग्रेसमधून बाहेर पडलेले संजय निरूपम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे; मात्र त्यांच्याखेरीच शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर किंवा सचिन खेडेकर या कलाकारांची नावेही या जागेसाठी चर्चेत आहेत. या जागेवर ठाकरे गटाच्या वतीने अमोल कीर्तीकर यांना तिकीट देण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी बापलेकातील संघर्ष टाळण्यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
पालघर मतदारसंघात ८२६ शंभरी पार केलेले मतदार !
पालघर – या लोकसभा मतदासंघात वयाची शंभरी ओलांडलेले एकूण ८२६ मतदार आहेत. यातील वसई मतदारसंघात ३०५, डहाणू १४७, नालासोपारा १४२, पालघर १२५, बोईसर ७६, तर विक्रमगड मतदारसंघात ३१ जण आहेत. १२० वर्षे वय पूर्ण केलेले ६ मतदार आहेत. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर न जाता घरातूनच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. याकरिता नमुना अर्ज ‘१२ डी’ भरून घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या दुसर्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी ४७७ अर्ज आले !
मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभेच्या दुसर्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी ३५२ उमेदवारांनी ४७७ अर्ज भरले आहेत. महाराष्ट्रामध्ये दुसर्या टप्प्याचे मतदान बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये २६ एप्रिल या दिवशी होणार आहे.
वसई येथे प्लास्टिकविरोधी मोहीम !
वसई – येथे मागील २ वर्षांत विविध कारवायांत २७ सहस्र ६८१ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. यामधून १५ लाख ५० सहस्रांचा दंड वसूल झाला, अशी माहिती आरोग्य आणि स्वच्छता विभागाने दिली. वसई-विरार महापालिका ही कारवाईची मोहीम राबवत आहे.
समुद्रात बोट उलटली !
अलीबाग – खांदेरी दुर्गावरून परतणारी बोट खवळलेल्या समुद्रात उलटी झाली. सुदैवाने या कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्गावर वेताळदेवाच्या दर्शनाला जातात. वेताळाचे दर्शन घेऊन ३१ मार्च या दिवशी साखर-आक्षीमधील काही तरुण परतत होते. १५ तरुण पाण्यात पडले; मात्र त्यांनी पोहत किनारा गाठला.