Mhadei Water Dispute : संयुक्त पहाणीच्या वेळी कर्नाटकचे काम बंद पाडण्याची मागणी करणार ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर,गोवा
म्हादई जलवाटप तंटा
पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) : म्हादईप्रश्नी ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाने संयुक्त पहाणी करण्यासाठी गोव्याला पत्र पाठवले आहे. गोवा सरकार ९ एप्रिलपर्यंत संयुक्त पहाणीसाठीची वेळ ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाला कळवणार आहे. या संयुक्त पहाणीच्या वेळी म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकने चालवलेले काम बंद पाडण्याची मागणी गोवा सरकार करणार आहे. या पहाणीच्या वेळी गोव्याच्या जलस्रोत खात्याचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य अभियंता, अतिरिक्त अभियंता, सचिव आदी अधिकारी असणार आहेत, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
(सौजन्य : Goa Plus News Channel)
ते पुढे म्हणाले,
‘‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाने गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांना पत्रे लिहून संयुक्त पहाणीसाठी प्रत्येक राज्याच्या सवडीनुसार तारखा मागवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांची संयुक्त पहाणीसाठीची वेळ ‘म्हादई प्रवाह’ला कळवली आहे. गोवा सरकार तारखा आणि कुठल्या भागात पहाणी करणार याविषयीची विस्तृत माहिती ९ एप्रिल या दिवशी सकाळपर्यंत प्राधिकरणाला कळवणार आहे. ‘म्हादई प्रवाह’ची स्थापना झाल्यानंतर १० डिसेंबर २०२३ या दिवशी राज्य सरकारने पहिले पत्र प्राधिकरणाला लिहिले आणि यानंतर प्राधिकरणाची १३ फेब्रुवारी या दिवशी पहिली बैठकही झाली. गोवा सरकारचे ‘म्हादई प्रवाह’कडे आतापर्यंत ४ वेळा व्यवहार झालेले आहेत. सरकारने ‘म्हादई प्रवाह’ला २२ मार्च या दिवशी चौथे पत्र पाठवले आहे. म्हादईच्या ठिकाणी कर्नाटकने काम चालू ठेवल्याने गोवा सरकारने वेळोवेळी तक्रार केलेली आहे. ‘म्हादई प्रवाह’चे अध्यक्ष नेमकी पहाणी कुठे करायची याविषयी निर्णय घेणार आहेत.’’