अनिश्चिततेच्या गर्तेत कोसळलेला इस्लामी आणि यहुदी संघर्ष म्हणजे जगाला डोकेदुखी !

अनिश्चिततेच्या गर्तेत कोसळलेला इस्लामी आणि यहुदी संघर्ष अख्ख्या जगाला डोकेदुखी ठरतो कि काय ? अशी रास्त भीती वाटू लागली आहे. नुकताच दमिष्कमधील (सीरिया) इराणी दूतावासावर इस्रायलने केलेल्या हवाई आक्रमणात ‘इराणी शिया मिलिशिया इस्लामिक रिव्हर्शल्युशनरी गार्ड कोअर’चा वरिष्ठ कमांडर महंमद रेझा झहिदी आणि अन्य ५ वरिष्ठ सैन्य अधिकारी ठार झाले. यामुळे इराक आणि इराण यांच्या युद्धाच्या आठवणी ताज्या होत आहेत. यात केवळ आता इराक कस्पटासमान उरला आहे आणि इस्रायल नवा खेळाडू भरती झाला आहे. इराकमध्ये शिया पंथीय मुसलमान ७० टक्के असूनही सुन्नी हुकूमशाह सद्दाम हुसेनने तिथे अल्पसंख्य सुन्नी मुसलमानांची राजवट कित्येक वर्षे चालवली. याविरोधात शिया इराणने दंड थोपटून युद्ध छेडले.

१. ‘शिया आर्क’ची (शिया प्रदेशाची) महत्त्वाकांक्षी इराणी योजना !

इराण ते लेबनॉन यांच्यामध्ये शिया लोकसंख्या असलेले प्रदेश एका राजकीय अधिपत्याखाली आणण्याच्या आणि कल्पनेतील ‘शिया आर्क’ प्रत्यक्षात आणण्यासाठी हा सर्व उपद्व्याप चालू आहे. इराणी शिया राजवटीच्या या जुन्या योजनेचा भाग म्हणून इराणचे सैन्य अधिकारी इराक, सीरिया, लेबनॉन, गाझा या भागात तैनात करते आणि विविध सशस्त्र गटांना अफाट साहाय्य करते. याला आळा घालण्यासाठी इस्रायलने डिसेंबरमध्ये एका इराणी सैन्य अधिकार्‍यावर हवाई आक्रमण करून त्याची हत्या केली होती. त्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या झहिदी या अधिकार्‍याला ३ दिवसांपूर्वी झालेल्या आक्रमणात मारले.

२. अरब राजांचे इस्रायलशी दैनंदिन व्यवहार चालूच !

श्री. विनय जोशी

‘इस्लामिक स्टेट’ने (इसिसने) गेल्या दशकात या भागात स्वतःचे पाय रोवल्यानंतर तेल आणि गॅस संपन्न समस्त इस्लामी जगत आरपार ढवळून निघाले. कट्टरतावादी इस्लामिक स्टेट आज ना उद्या एकेकाळी इस्लामी जगाला ढवळून काढणार्‍या वहाबी कट्टर सुन्नी इस्लामला मागे टाकून आपापल्या अरब राजेशाह्या उलथवेल कि काय ? या भीतीने त्रस्त श्रीमंत अरब राजपरिवार बघता बघता कट्टरविरोधी ‘यहुदी’, ‘झिओनिस्ट’ (इस्रायलच्या स्थापनेसाठी ज्यूंची चळवळ) असलेल्या इस्रायलशी आधी लपून छपून संबंध निर्माण केले आणि नंतर अगदी उघड सैनिकी व्यापारापर्यंत यांच्यात व्यवहार चालू झाले. या सुन्नी-यहुदी युतीला अस्थिर करण्यासाठी शिया इराण समर्थित सुन्नी आतंकवादी गट हमासने ७ ऑक्टोबर २०२३ चे आचरट आक्रमण खुद्द इस्रायली भूमीवर करून नव्या युद्धाला तोंड फोडले, जेणेकरून इस्रायल तिखट प्रतिक्रिया देईल आणि मध्य पूर्वेतील यहुदी-सुन्नी युती मोडेल. असे असले, तरी आजघडीला इराणची ही आशा फोल ठरलेली दिसत आहे. समस्त सुन्नी अरब राजघराणी बिनबोभाट इस्रायलशी दैनंदिन कारभार, तर दुसरीकडे गाझा पट्टीत साहाय्य केल्याचेही भासवत आहेत !

३. हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आशिया अन् युरोप यांना विळख्यात घेण्याची शक्यता !

सुन्नी अरबांच्या या ढोंगी व्यवहाराला पुरते जाणून इस्रायल आता हे युद्ध इराणच्या दिशेने नेते कि काय ? अशी शंका आता येत आहे. यामुळे लेबनॉनमधील शिया हिजबुल्ला आणि अन्य शिया गट अधिक सुन्नी हमास विरुद्ध इस्रायल यांच्या संघर्षाची व्याप्ती येणार्‍या काळात इराणच्या दिशेने मोठ्या प्रदेशात पसरलेली दिसेल ! यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे जग अस्थिर होईल. परिणामी त्यांच्या दरात अस्थिरता निर्माण होऊन भले भले देश भविष्यात आडवेतिडवे होतांना दिसतील.

एकूणच काय ‘हमास’ आतंकवादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता स्थानिक राहिलेला नसून तो हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून आशियात अन् दुसर्‍या बाजूने युरोपला आपल्या विळख्यात घेईल, यात कोणतीही शंका उरलेली नाही !

– श्री. विनय जोशी, गौहत्ती, आसाम. (३.४.२०२४)

(श्री. विनय जोशी यांच्या फेसबुकवरून साभार)