संपादकीय : अमेरिकेची अनास्था !
भारतातील हिंदू आज असुरक्षित आहेत. त्यासह अमेरिकेतील हिंदूही अन्याय, अत्याचार, तसेच गुन्हेगारी यांचा सामना करत आहेत. हे सर्व संपण्याची काही चिन्हेच दिसत नाहीत. उलट त्यांचे प्रमाण वाढत आहे. ‘अमेरिकेतील हिंदू संकटात आहेत’, हे लक्षात घेऊन तेथील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, श्री ठाणेदार, प्रमिला जयपाल आणि अमी बेरा यांनी तेथील नागरी हक्क विभागाच्या क्रिस्टन क्लार्क यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी अमेरिकेतील हिंदूंची खेदजनक स्थिती मांडून त्याविषयी चिंता व्यक्त केली. १८ एप्रिलपर्यंत याविषयीचे उत्तर कळवण्याची समयमर्यादा दिली आहे. सातासमुद्रापार असणार्या देशात खासदारांनी हिंदूंची बाजू उचलून धरणे, त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे, अत्याचारांची नोंद घेणे, हे प्रशंसनीय आणि हिंदूंसाठी दिलासाजनक आहे. हिंदूंची बाजू घेणारे, त्यांच्याप्रती काळजी, तसेच आपुलकी असणारे खासदार अमेरिकेत असणे चांगलेच आहे; पण केवळ त्यांच्यावरच अवलंबून न रहाता अमेरिकेतील हिंदूंनीही याविरोधात आवाज उठवावा आणि संघटित व्हावे. अमेरिकेतील प्रत्येक हिंदू पूर्णतः सुरक्षित असला पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला हवेत. खासदारांनी विषय उचलला आहेच; पण तो पूर्णत्वास जाईपर्यंत पाठपुरावाही घ्यायला हवा. कॅलिफोर्नियामध्ये हिंदु मंदिरांच्या संदर्भात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तेथील हिंदू चिंतीत आहेत. इतकी आक्रमणे होऊनही आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे ‘आणखी एखाद्या मंदिरावर आक्रमण होईल कि काय ? पुन्हा आपल्यालाच लक्ष्य केले जाईल कि काय ? आपणही या वाढत्या ‘हिंदुफोबिया’ची (हिंदूंविषयी तिरस्काराची) शिकार होऊ का ?’, अशी धास्ती हिंदूंच्या मनात आहे. अशा स्थितीत हिंदूंना दिलासा कोण देणार ? हिंदूंच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे खासदार हेच सध्यातरी हिंदूंसाठी आशेचा किरण आहेत.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर इतके आघात होऊनही अमेरिका काय करत आहे ? बलाढ्य, श्रीमंत आणि विकसित असणार्या अमेरिकेसाठी हे लाजिरवाणेच आहे. जी अमेरिका ऊठसूठ भारताला सल्ले देते, भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत ‘आम्हाला भारताप्रती आस्था आहे’, असे दाखवते, ‘भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत’, असे सांगते, मग ‘तिच्याच देशातील हिंदू असुरक्षित का बरे ? हिंदूंकडेच अमेरिकेचे दुर्लक्ष का ?’, असे प्रश्न कुणाच्याही मनात येतील. ‘यातून अमेरिकेचा हिंदुद्वेषी चेहराच उघड होत आहे’, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. आरोपींचा अजूनही शोध न लागणे यातूनच या घटनांची मूक साक्षीदार असणारी अमेरिका स्वतःत मुरलेला हिंदुद्वेष दर्शवते. ‘खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात’, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय अमेरिकेच्या भूमिकेतून येतो. थोडक्यात काय, तर वरील घटनांच्या अनुषंगाने अमेरिकेचा प्रतिसाद थंड म्हणजे ‘नरोवा कुंजरोवा ।’ (कोणत्याही गोष्टीविषयी भाष्य न करणे आणि केल्यास संभ्रम निर्माण करणे) असाच आहे, हे प्रकर्षाने दिसून येते.
मानवतावाद कि हिंदुद्वेष ?
आतापर्यंत हिंदूंच्या मंदिरांवर झालेल्या आघातांच्या मागे फुटीरतावादी शक्ती, आतंकवादी किंवा खलिस्तानी कट्टरपंथी नसतील कशावरून ? अनेकांकडून या सर्वांची शक्यताही वर्तवण्यात आली होती. काही ठिकाणी तर खलिस्तानवादी असल्याचे उघडही झाले होते. असे असतांना अमेरिकेतील न्याययंत्रणा, पोलीस यांनी या अनुषंगाने अन्वेषण केले का ? या सर्वांचा सूत्रधार कोण ? त्यांचा शोध घेतला का ? तर नाही ! ‘तेथील संबंधित अधिकारी असोत किंवा प्रसारमाध्यमे यांनी अमेरिकेतील वाढत्या हिंदुद्वेषाला न्यून लेखले आहे किंवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले’, अशी टीका केली जात आहे. अमेरिकेत अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; पण असे असले, तरी त्याच्या नावाखाली आतंकवाद केला जात असेल किंवा त्याचे समर्थन केले जात असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अमेरिकेने हिंदुद्वेषी प्रवृत्तींना खतपाणी घालू नये.
अमेरिकेच्या लोकसंख्येमध्ये सुमारे ३० लाख हिंदू, १२ लाख बौद्ध, ५ लाख शीख आणि २ लाख जैन आहेत. येथे १ सहस्र हिंदु मंदिरे, १ सहस्र बौद्ध मंदिरे, ८०० गुरुद्वारा आणि १०० जैन मंदिरे आहेत. अमेरिकेतील हिंदूंची संख्या अन्य धर्मियांच्या तुलनेत लक्षणीय आहे. त्यामुळे येथे हिंदूंच्या संदर्भात अन्यायकारक प्रकार होणे अपेक्षितच नाहीत. कोलकाता येथील भरतनाट्यम् नर्तकाची अमेरिकेत झालेली हत्या, शीख संगीतकाराची हत्या होऊन ५ दिवस उलटूनही त्याचे शवविच्छेदन न होणे, भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूला उत्तरदायी असणार्या अमेरिकी पोलीस अधिकार्याला शिक्षा न होणे हे सर्व प्रकार अमेरिकेचा हिंदुद्वेषच वारंवार अधोरेखित करतात. अन्य धर्मियांच्या संदर्भात जरा काही खुट् झाले की, अमेरिका लगेच त्याला विरोध करते. मग मानवतावादाचा पुरस्कार करणारी ही अमेरिका हिंदूंच्या संदर्भातील घटनांमागील कारणे देण्यास मात्र सोयीस्कररित्या टाळाटाळ करते. हिंदूंच्या आस्थेवर होणार्या आक्रमणांची वाढती शोकांतिका पहाता भारताने अमेरिकेचा यासाठी पाठपुरावा घ्यायला हवा, तसेच अशा घटना रोखण्यासाठी किंवा त्यांना आवर घालण्यासाठी काय प्रयत्न करणार ? याचेही उत्तर अमेरिकेकडून मागवून घ्यायला हवे. वेळोवेळी अमेरिकेला खडसावायला हवे, तसेच ज्या प्रकरणांचा अमेरिकेने आतापर्यंत छडा लावलेला नाही, त्यांचे तातडीने अन्वेषण करून हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, यासाठी भाग पाडावे. हिंदूंची हयगय झाल्यास भारतानेही कणखर परराष्ट्र नीती राबवावी.
हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी !
अमेरिकेत होणार असलेल्या निवडणुकीसाठी सध्याच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने स्वतःच्या घोषणापत्रात एक पान केवळ हिंदूंसाठी ठेवले आहे. अमेरिकेत अंदाजे ३० लाख हिंदु मतदार आहेत. अर्थात् डेमोक्रॅटिक पक्षाचा हा प्रयत्न केवळ हिंदूंच्या लांगूलचालनासाठी आहे, हे न समजण्याइतके हिंदू दूधखुळे नाहीत. अमेरिकेने प्रत्येक वेळी हिंदूंना गृहीत धरू नये. हिंदूंनीही घोषणापत्राला भुलून जाऊ नये. उलट सुरक्षित जीवन, न्याय्य वागणूक, स्वातंत्र्य या गोष्टींसह देशात कायदा-सुव्यवस्था राबवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी लावून धरावी. ज्या गोष्टी उघड सत्य म्हणून समोर आल्या आहेत, त्यांचे दायित्व अमेरिकेने नाकारू नये. हिंदूंच्या सुरक्षेची हमी अमेरिकेने द्यावी, हेच भारताला अपेक्षित आहे.
मानवतावादाची पुरस्कर्ती; पण हिंदुविरोधी घटनांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणारी अमेरिका म्हणूनच हिंदुद्वेषी ठरते ! |