पी.एम्.पी.च्या प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ !
तिकीट विक्रीतून मिळणार्या उत्पन्नात ७८ कोटी रुपयांची वाढ !
पुणे – पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पी.एम्.पी.) वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ झाल्याने तिकीट विक्रीतून मिळणार्या उत्पन्नात ७८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे पी.एम्.पी.ची संचालन तूट अल्प होण्यास साहाय्य होणार आहे. पुणे, पिंपरी आणि पी.एम्.आर्.डी.ए.च्या हद्दीत पी.एम्.पी.कडून अंदाजे १ सहस्र ७०० बसच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा दिली जाणार आहे. पी.एम्.पी.चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी उत्पन्न वाढवण्यासह तोटा अल्प करण्यावर भर दिला, तसेच बसचे ब्रेक निकामी होण्याचे प्रमाण न्यून करण्यासाठी प्रयत्न करून ‘जास्तीत जास्त बस मार्गावर कशा रहातील ?’ याकडे लक्ष दिले. पी.एम्.पी.च्या अधिकार्यांना मार्गावर फिरायला लावून अल्प उत्पन्न असलेल्या मार्गावर उत्पन्न वाढवण्याचे दायित्व अधिकार्यांना दिले. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात ६ महिन्यांत प्रतिकिलोमीटर ५० पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. ऑगस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे ५७ कोटी रुपये उत्पन्न पी.एम्.पी.ला मिळाले होते. असे असले तरी पी.एम्.पी.च्या ताफ्यातील २६६ बस संचालनातून बाद होणार आहेत, तर ३२७ बसला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मार्गावरील बसची संख्या अल्प होणार आहे. नव्या ४०० बसची निविदा प्रक्रिया चालू आहे; मात्र त्या बस प्रत्यक्ष ताफ्यात येण्यासाठी आणखी काही मासांचा कालावधी लागेल. त्यामुळे बसअभावी पी.एम्.पी.चे उत्पन्न पुन्हा अल्प होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केली. (हे नियोजन अगोदरच का केले नाही ? यामुळे उत्पन्न अल्प झाले आणि जनतेलाही त्रास सहन करावा लागणार आहे, असे पुन्हा होऊ नये, यासाठी काय उपाययोजना काढणार ? हे समजले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकासामान्य जनतेच्या सुविधांचा विचार करून सार्वजनिक वाहतूक सुधारण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे ! |