मालगुंड (रत्नागिरी) येथे ६ आणि ७ एप्रिलला ‘कोमसाप’चे जिल्हा मराठी साहित्य संमेलन

रत्नागिरी – कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसापचे) जिल्हा मराठी साहित्य संमेलन ६ आणि ७ एप्रिलला मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर आणि संमेलन संयोजन समितीचे प्रमुख रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनात शनिवारी सकाळी ८.३० वा. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. १० वाजता उद्घाटन कार्यक्रमाला संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, साहित्यिक सुरेश जोशी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर आदी उपस्थित रहाणार आहेत.

या संमेलनात पहिल्या दिवशी दुपारी १२.३० ते २ या वेळेत ‘पुस्तके सांगतात खूप काही’ हा परिसंवाद, दुपारी ३ वा. कविता पद्य पदन्यास, ४.३० वाजता युवक आणि समाजमाध्यमांवरील लेख यावर संवाद, सायं. ६.३० ते ८ या वेळेत ‘नैऋत्येकडील वारा’  कवीसंमेलन, रात्री ८ वा. स्नेहभोजन आणि ९ वा. कोकणातील लोककलांचा सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. यात कोळीनृत्य, जाखडी, मंगळागौर, नमन, समई नृत्य, पोवाडा आणि अन्य कार्यक्रम आहेत.

७ एप्रिलला सकाळी ९ वाजता ‘बदलते कोकण परिसंवादात पर्यटन आणि उद्योगावर रमेश कीर, सांस्कृतिकवर नितीन जोशी, शैक्षणिकविषयी प्राचार्य सुशील शिवलकर, पत्रकारितेवर पत्रकार सतीश कामत संवाद साधतील. प्रमोद कोनकर याचे संवादक आहेत. सकाळी ११.१५ ते १ या वेळेत ‘कवितेच्या गावा जावे’, दुपारी १ ते २ बालसाहित्याच्या प्रांगणात हा विशेष कार्यक्रम, दुपारी ३ वा. कवी संमेलन आणि दुपारी ४.३० वा. संमेलनाचा समारोप होईल.