पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !
‘माझे यजमान श्री. समीर चितळे हे ‘अल्फा लावल’ या ‘मल्टीनॅशनल’ आस्थापनामध्ये मागील १० वर्षांपासून नोकरी करत आहेत. १.१.२०२१ या दिवसापासून ते पुण्यातील दापोडी येथील शाखेत ‘फॅक्टरी मॅनेजर’ म्हणून कार्यभार सांभाळू लागले. मी मागील २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना आणि सेवा करत आहे. वर्ष २०२१ मध्ये माझे यजमान गंभीर रुग्णाईत असतांना ‘गुरुतत्त्व एकच असून ते वेगवेगळे संत आणि व्यक्ती यांच्या माध्यमातून आपल्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन करते’, याची अनुभूती देवाने मला पावलोपावली दिली. यजमान रुग्णाईत असतांना त्यांना झालेले त्रास आणि देवाची (परात्पर गुरु डॉक्टरांची) अनुभवलेली कृपा कृतज्ञतेच्या भावाने गुरुचरणी अर्पण करत आहे.
(भाग १)
१. यजमान रुग्णाईत होण्याविषयी समर्थभक्त श्री. म्हाळंक यांनी दिलेली पूर्वसूचना !
डिसेंबर २०२० मध्ये माझ्या यजमानांना (श्री. समीर चितळे यांना) ‘त्यांच्या आस्थापनाने त्यांचे पुण्यात स्थानांतर केले’, असे समजले. तेव्हा यजमानांनी पुणे येथे येऊन श्री स्वामी समर्थभक्त श्री. म्हाळंक यांना भेटून सांगितले, ‘‘माझे पुण्यात स्थानांतर झाले आहे.’’ तेव्हा श्री. म्हाळंक त्यांना म्हणाले, ‘‘पुण्यात यावेच लागणार आहे; पण थोडा त्रास होणार आहे. काही रक्कम बाजूला काढून ठेवा. औषधोपचारासाठी व्यय होऊ शकतो.’’ तेव्हा त्यांच्या या बोलण्याचा अर्थ आम्हाला उमगला नाही.
२. पुणे येथे आल्यानंतर यजमानांना झालेले त्रास
२ अ. यजमानांना पहाटे अकस्मात् चक्कर येणे आणि चक्कर न्यून होण्याची औषधे देऊनही उपयोग न होणे : ४.१.२०२१ या दिवशी पहाटे ५ वाजता यजमानांना अकस्मात् चक्कर आली. तेव्हा त्यांचा रक्तदाब पाहून चक्कर न्यून होण्यासाठी त्यांना काही औषधे दिली; परंतु त्यांच्या स्थितीत पालट झाला नाही. त्यामुळे त्यांना पुणे येथील ‘सह्याद्री हॉस्पिटल’मध्ये भरती केले.
२ आ. रक्तात गुठळी होऊन लहान मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे ७० टक्के इजा होणे : त्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता मेंदूची एम्.आर्.आय. (टीप १) (Brain with Angiography) (Bilateral cerebellar Infarct) चाचणी केल्यानंतर ‘लहान मेंदूला ७० टक्के इजा (Bilateral cerebellar Infarct) झाली आहे’, असे कळले. ‘रक्तात निर्माण झालेल्या गुठळीमुळे लहान मेंदूला रक्तपुरवठा होऊ न शकल्याने लहान मेंदूला मोठ्या प्रमाणात इजा झाली’, असे लक्षात आले. यजमानांच्या आजाराचे निदान होऊन उपचार चालू होण्यास रात्रीचे ८ वाजले. या सगळ्यांत १५ घंट्यांचा कालावधी गेला; मात्र एवढे होऊनही त्यांच्या मोठ्या मेंदूला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. या गंभीर परिस्थितीत केवळ प.पू. गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) त्यांचे रक्षण केले.
टीप १ – रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढणे
३. एकापाठोपाठ आलेल्या समस्यांमुळे मेंदूची एका आठवड्यात पाठोपाठ करावी लागलेली २ शस्त्रकर्मे !
३ अ. यजमानांची स्थिती अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या मेंदूचे ‘डी कॉम्प्रेशन’ शस्त्रकर्म करावे लागणे : ६.१.२०२१ या दिवशी यजमानांची स्थिती अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या मेंदूचे ‘डी कॉम्प्रेशन’ शस्त्रकर्म (टीप २) करावे लागले. आधुनिक वैद्य जयंत सबनीस आणि आधुनिक वैद्य रणजीत देशमुख यांनी अतिशय दक्षतेने अन् सुरक्षेचे सर्व उपाय करून शस्त्रकर्म केले. त्यामुळे मेंदूमध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाला नाही.
टीप २ – मेंदूवर आलेला दाब न्यून करण्यासाठी केले जाणारे शस्त्रकर्म
३ आ. पहिले शस्त्रकर्म झालेल्या ठिकाणी अंतर्गत रक्तस्राव होऊन यजमानांची स्थिती अत्यवस्थ झाल्यामुळे आधुनिक वैद्यांनी तातडीने दुसर्या शस्त्रकर्माची सिद्धता करणे : ‘रक्ताची गुठळी होऊ नये’, यासाठी यजमानांना रक्त पातळ होण्याची औषधे चालू केली होती. १२.१.२०२१ या दिवशी त्या औषधांचा परिणाम होऊन शस्त्रकर्म झालेल्या ठिकाणी अंतर्गत रक्तस्राव झाला आणि त्याची गुठळी झाली. ही गुठळी मज्जारज्जूजवळ झाल्यामुळे यजमानांची स्थिती अत्यवस्थ झाली. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी रात्रीच दुसर्या शस्त्रकर्माची सिद्धता केली.
४. वेगवेगळ्या माध्यमांतून अनुभवलेली गुरुकृपा !
४ अ. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आधुनिक वैद्य आणि त्यांचे सर्व साहाय्यक यांनी यजमानांची प्रेमाने काळजी घेऊन त्यांचे शस्त्रकर्म वेळेत करणे : आधुनिक वैद्यांनी माझ्या मुलाला (श्री. चिन्मय चितळे याला) ‘काळजी करू नकोस. आम्ही बघतो’, असे सांगितले होते. ‘शस्त्रकर्म करायला विलंब होऊ नये’, यासाठी आधुनिक वैद्यांनी यजमानांना रक्तही शस्त्रकर्म कक्षात दिले. तेथील आधुनिक वैद्य, परिचारिका, साहाय्यक आणि अतीदक्षता विभागातील सर्वच जण यांनी यजमानांची डोळ्यांत तेल घालून अन् अत्यंत प्रेमाने काळजी घेतली. केवळ गुरुकृपेमुळे ‘कुठेही विलंब न होता सर्वकाही वेळेत आणि व्यवस्थित झाले’, याची अनुभूती आम्हाला आली.
४ आ. स्वामी समर्थभक्त श्री. म्हाळंक यांनी ‘काळजी करू नका, सर्व नीट होईल’, असे सांगणे आणि त्या वेळी ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्वस्त केले’, असे जाणवणे : यजमान रुग्णालयात असेपर्यंत आम्ही प्रतिदिन स्वामी समर्थभक्त श्री. म्हाळंक यांच्या मठात जाऊन ‘परात्पर गुरु डॉक्टर आशीर्वाद देत आहेत’, या भावाने स्वामी समर्थांचे दर्शन घेत होतो. एकदा आम्हाला रुग्णालयातून येण्यास पुष्कळ उशीर झाला. तेव्हा ‘मठ बंद झाला असेल, तर बाहेर उभे राहून स्वामींचे मानस दर्शन घेऊ’, असा विचार करून आम्ही दर्शन घेण्यास गेलो. दर्शन घेऊन घरी येण्यास निघतांना श्री. म्हाळंक यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सर्व नीट होईल.’’ तेव्हा ‘जणूकाही परात्पर गुरु डॉक्टरच आमच्यासाठी थांबले होते आणि आम्हाला आश्वस्त करत होते’, असे आम्हाला जाणवले.
५. यजमान रुग्णाईत असतांना केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय !
५ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करणे : या संपूर्ण कालावधीत आमचे पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४१ वर्षे) यांच्याशी वेळोवेळी बोलणे होत होते. सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून वेळोवेळी नामजपादी उपाय मिळत होते. हे सर्व नामजपादी उपाय माझी आई सौ. राजश्री गोंधळेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७४ वर्षे) आणि माझे वडील श्री. रवींद्र गोंधळेकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७९ वर्षे), हे दोघे करत होते.
५ आ. श्री. गणेश आळशीगुरुजी यांनी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय : आमच्या घरी पौरोहित्य करणारे श्री. गणेश आळशीगुरुजी यांनी यजमानांची जन्मकुंडली पाहिली. त्यानुसार मंगळ, गुरु, राहू, शनि या ग्रहांचे जप आणि महामृत्युंजय, असे प्रत्येकी ११ सहस्र जप ६ गुरुजी करत होते. गुरुजींचे घर पुष्कळ दूर असूनही त्यांनी जप पूर्ण झाल्यावर रुग्णालयात येऊन आम्हाला जपाची विभूती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी ११ गुरुवारी दत्त मंदिरात हरभर्याची डाळ आणि गूळ यांचे दान देण्यास अन् ११ शनिवारी हनुमंताला काळे उडीद वाहून नारळ फोडण्यास सांगितले. यजमानांचे आरोग्य पूर्ववत् होण्यासाठी त्यांनी महाशिवरात्रीला लघुरुद्र करून रुद्राभिषेकातील तीर्थाने यजमानांना डोक्यावरून स्नान करण्यास सांगितले. त्याचाही यजमानांना पुष्कळ लाभ झाला.
हे सर्व उपाय पूर्ण झाल्यावर दुसर्याच दिवशी कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे मंदिरे दर्शनासाठी पुन्हा बंद झाली. ‘प.पू. गुरुदेवांनीच आमच्याकडून हे उपाय विनाअडथळा पूर्ण करून घेतले’, अशी आम्हाला अनुभूती आली.
५ इ. रुग्णालयात असतांनाही ५ दिवस ‘नारळाने दृष्ट काढणे’, हा उपाय गुरुदेवांच्या कृपेनेच करता आला.
५ ई. कुटुंबियांनी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय : २८.१.२०२१ या दिवशी यजमानांना रुग्णालयातून घरी आणल्यापासून माझ्या सासूबाईंनी (श्रीमती अपर्णा चितळे (वय ७४ वर्षे) यांनी) प्रतिदिन श्रीमद्भगवद्गीतेचा एक अध्याय अर्थासह वाचण्यास आरंभ केला. त्याचप्रमाणे आम्ही ‘रामरक्षा, मारुतिस्तोत्र, शिवकवच आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले मंत्रपठण करून त्याचे तीर्थ अन् विभूती यजमानांना लावणे’, हे उपाय नियमितपणे करत होतो. (क्रमश:)
– सौ. मोहिनी समीर चितळे (श्री. समीर चितळे यांच्या पत्नी), पुणे (५.३.२०२२)
भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/782017.html
|