पिण्याच्या पाण्यासाठी जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !
|
जेजुरी (जिल्हा पुणे) – महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या १० दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी, विशेषत: महिलांनी जेजुरी नगरपालिकेमध्ये सामूहिक खेद व्यक्त केला. येत्या ८ दिवसांमध्ये नियमित पाणीपुरवठा न झाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची चेतावणी जेजुरीकरांनी निवेदनाद्वारे दिली आहे. (अशी वेळ नागरिकांवर का येते ? लोक संतप्त का होतात ? याचा नगरपालिका प्रशासनाने विचार करायला हवा ! – संपादक)
जेजुरीमध्ये मागील २ महिन्यांपासून अनियमित आणि अल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच १० दिवस पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक आणि महिला यांनी नगरपालिका मुख्याधिकार्यांशी चर्चा केली. या वेळी वीर धरणांतून कायमस्वरूपी पिण्यासाठी पाणी द्यावे, गेली २५ वर्षे मागणी करूनही वीर धरणाचे पाणी का मिळत नाही ? असे प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आले.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश ! |