५७ कोटी रुपयांचा कर बुडवल्याच्या प्रकरणी पुणे येथील मद्य बनवणार्‍या आस्थापनाच्या संचालकांवर गुन्हा नोंद !


पुणे
– ‘महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२’ची प्रलंबित थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणार्‍या ‘ब्रुक्राप्ट माइक्रो प्रायव्हेट लिमिटेड’ या मद्य (बिअर) बनवणार्‍या आणि विकणार्‍या आस्थापनाला राज्य कर विभागाने दणका दिला आहे.

५७ कोटी ४८ लाख ६९ सहस्र ४१५ रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी आस्थापनाच्या २ संचालकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुकेतू तळेकर आणि प्रतीक चतुर्वेदी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राज्य कर निरीक्षक दीपक शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या आस्थापनाचे संचालक तळेकर आणि चतुर्वेदी यांनी मूल्यवर्धित कर कायदा २००२ च्या कलम २० अन्वये विवरणपत्रके प्रविष्ट करणे बंधनकारक असतांना त्यांना वारंवार याविषयी सूचित केले होते, तसेच ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली होती. त्यालाही योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने आणि कर चुकवल्याने आस्थापनाच्या २ संचालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.