राज्यातील ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार !
|
मुंबई – विविध कारणांसाठी राज्यातील तब्बल ६५ गावांतील ४१ सहस्र ४४० मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घोषित केला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुरूर्डी येथील ग्रामस्थांनी चक्क भ्रमणभाषला ‘रेंज’ नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. काही गावांमध्ये रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा नसल्यामुळेही मतदानावर बहिष्कार घोषित करण्यात आला आहे.
१. सुरूर्डी गावामध्ये मागील २० वर्षांपासून भ्रमणभाषला रेंज नाही. गावात भ्रमणभाषसाठी मनोरे बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे केली आहे; मात्र त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा थेट ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला आहे.
२. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य आदी मूलभूत सुविधा नसल्यामुळे फुगाळे अन् दापूर येथील ३ सहस्र ४६६ मतदारांनी मतदान न करण्याची घोषणा केली आहे.
३. बारामती लोकसभा मतदारसंघातील मोढवे गावात मोकाट जनावरे शेतीची हानी करत असल्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे करूनही उपाययोजना काढण्यात न आल्यामुळे येथील २ सहस्र ७०० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घोषित केला आहे.
४. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पुनर्वसन न केलेल्या ३५९ भूकंपग्रस्तांनी, तर ठाणे लोकसभा मतदारसंघात सिडकोने भूमी अधिग्रहीत करून पुनर्वसन न केल्यामुळे २० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घोषित केला आहे.
५. माढा (सोलापूर) लोकसभा मतदारसंघात उपसा सिंचन योजनेसाठी निधी संमत न केल्यामुळे २५ सहस्र मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
संपादकीय भूमिकानेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच ! |