हिंजवडी (पुणे) येथे पुलाचे काम करतांना ‘बाँबशेल’ सापडले !

पुणे – पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून (पी.एम्.आर्.डी.ए.) चालू असलेल्या माण-मारुंजी रस्त्यावर पुलाच्या कामाच्या वेळी रणगाड्यांचे बाँबशेल (बाँबचा पुढील भाग) सापडले. हिंजवडी पोलिसांनी हे बाँबशेल कह्यात घेतले आहेत. याविषयी संरक्षण विभागाच्या सदर्न कमांडला कळवण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी हे बाँबशेल त्यांच्या कह्यात देण्यात आले आहेत.

माण-मारुंजी रस्त्यावर ‘ब्ल्यू रिच सोसायटी’च्या मागील बाजूला पुलाचे बांधकाम चालू आहे. ३ एप्रिल या दिवशी दुपारी जे.सी.बी. या यंत्राने खोदकाम चालू होते. माती काढत असतांना कामगारांना बाँबसदृश वस्तू आढळून आली. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये रणगाड्याच्या बाँबचा पुढील भाग (बाँबशेल) असल्याचे आढळून आले.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात म्हणाले की, हे बाँबशेल पुष्कळ जुने असल्याने ते जिवंत आहे कि निकामी, हे अद्याप समजू शकलेले नाही. संरक्षण विभागाला याविषयी कळवण्यात आले आहे. संरक्षण विभागाकडून त्याची पडताळणी केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल.