धर्माकरता मानव ही सनातन धर्माची धारणा !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
१. बटू ब्राह्मण असल्याने पोहर्यातून पाणी दिले जाणे !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगतांना लिहितात….‘माझी गोष्ट सांगतो. लहानपणी मी ज्या गावात रहात होतो, तेथे १० – १२ घरे होती. गावात एक वैद्य होते. ते आमच्या जातीचे नव्हते. त्या काळी जातीभेद कटाक्षाने सांभाळला जात होता. रोटी-व्यवहार कटाक्षाने जातीजातीतच व्हायचा. तीन पिढ्यांपासून त्यांचे आमचे संबंध ! ते दोन गावचे पाटील होते. आम्ही उपाध्याय. ते आमचे यजमान. शेतीवाडी भरपूर होती. वैद्यकीय व्यवसायही उत्तम होता. त्यांचा मोठा वाडा होता. वयाच्या ५ व्या वर्षी माझी मुंज झाली. मी त्या वैद्यांकडे गेलो. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्या मुलासह मी खेळत होतो. मला तहान लागली. आजीने मला स्वच्छ पेला दिला आणि विहिरीवर पोहरा (विहिरीतून पाणी काढायचे लाकडाचे किंवा धातूचे भांडे) ठेवला. विहिरीला भरपूर पाणी होते. मी पाणी काढले आणि पेल्याने पाणी प्यायलो. एकदा मी त्यांच्या घरी गेलो. आजीने मला सातूचे पीठ आणि गूळ दिला. ती म्हणाली, ‘‘त्या लोट्याने विहिरीतील पाणी घेऊन ये.’’ मी पाणी आणले. ते पाणी सातूच्या पिठात कालवले. गूळ कालवून ते खाल्ले. एकदा त्यांच्याकडे आलेली एक सुवासिनी मला पेला भरून पाणी देत होती. आजी म्हणाली, ‘‘तो बटू ब्राह्मण आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे. पोहरा दे, लोटी- भांडे दे. तो पाणी घेईल. आपल्या हातचे पाणी पाजून का पापात पडायचे ?’’
२. वैद्य ब्राह्मण नसूनही सोवळे-ओवळे पार पाडणे
बटू ब्राह्मण म्हणून माझ्या बरोबरीची मुले मला नमस्कार करायची. मोकळेपणाने भांडाभांड करून खेळायचीही ! मोठ्या काकांकडे भांडणाच्या तक्रारीपण जायच्या. त्या घरच्या मोठ्या बायका मला कधी कधी रागवायच्या, कधी समजावून सांगायच्या; पण खाण्या-पिण्याच्या संदर्भातील निर्बंध मात्र कडक असायचे. माझ्या वडिलांपेक्षा ते वैद्य वयाने मोठे होते. ते आमच्या घरी यायचे. जेवायला बसायचे. त्यांच्यासाठी पाट ठेवला, तर पाट बाजूला ठेवून ते खालीच बसत. जेवण झाल्यावर उष्टे स्वतःच काढत. एकदा ते जेवायला भूमीवरच बसले. मी पाटावर बसून जेवलो. ते वैद्य जेवण झाल्यावर उष्टे काढायला लागले, तेवढ्यात आई आतून म्हणाली, ‘‘मोलकरीण आहे, ती उष्टे काढील.’’ ते वैद्य उठले, हात धुतला आणि घरी गेले. मोलकरीणीची वाट पाहून आईने स्वतः ती उष्टी पत्रावळ उचलली. तेवढ्यात काही कामानिमित्त ते वैद्य आमच्या घरी आले. आईला उष्टी पत्रावळ उचलतांना पाहून त्यांनी चटकन् अंगावरचा अंगरखा काढला आणि ती पत्रावळ घेऊन स्वतः बाहेर टाकली आणि म्हणाले, ‘कशाला मला पापात बुडवता ? मी का कुणी परका आहे ?’ त्या वैद्यांच्या घरी नेहमी पाहुण्यांची वर्दळ असे. विशेषतः ब्राह्मण मंडळीच अधिक असत. त्यामुळे त्यांचे सगळे सोवळे-ओवळे व्यवस्थित सांभाळले जायचे. त्यासाठी त्यांनी दोन हिंदी भाषिक पंडित ठेवले होते.
३. खाण्या-पिण्याची कडक शिस्त असणे
स्वतः वैद्यबुवा दुपारी ४ वाजता एकदाच जेवायचे. दुपारी कुणी ब्राह्मण आला, तर त्याचे जेवण झाल्यावर ते जेवायला बसायचे. त्यांची खाण्या-पिण्याची कडक शिस्त होती.
४. मैत्री आणि प्रेम यांत जातीयतेमुळे भेद निर्माण न होणे
माझ्या स्मरणातील एक प्रसंग चिरस्मरणीय आहे. एक श्रीमंत गृहस्थ वैद्यबुवांचे स्नेही होते. ते कुणबी आणि वैद्यबुवा वेगळ्या जातीचे. त्यांच्या हातचे अन्न-पाणी वैद्यांना चालत नसे. त्यांच्याकडे ज्या वेळी वैद्यबुवा जायचे, तेव्हा ते स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून जेवायचे. एकदा त्यांचा त्या श्रीमंत गृहस्थाकडे मुक्काम होता. पहाटे ते वैद्य शौचाला बाहेर गेले. थंडीचे दिवस होते. परत आल्यावर हात-पाय धुवायला त्यांच्या पत्नीने गरम पाणी आणून ठेवले आणि चूळ भरण्याकरता विहिरीवर पोहरा ठेवला. हात-पाय धुतल्यावर वैद्यबुवा विहिरीवर गेले आणि पोहर्याने पाणी काढून चूळ भरली. एवढे कडक निर्बंध; पण मित्रत्वात आणि प्रेमात तीळमात्र अंतर पडले नाही.
५. मानवाकरता निसर्ग, मानवाकरता धर्म ही आजची बेगुमान (गर्विष्ठ) धारणा !
भीषण अस्मानी आणि सुलतानी आपत्तीतही जातीसंस्था अन् शास्त्र परंपरा यांच्या अभेद्य कवचामुळे लक्षावधी वर्षे भारतवर्ष अभंग राहिला अन् तरला. इंग्रजी शासनात तो दंडक हळूहळू सुटू लागला. पाश्चात्त्य विचारांचे आकर्षण वाढू लागले आणि स्वतंत्र भारताचे नरकगमन दृढमूल झाले. यापासून स्वतःला वाचवण्यासाठी हे पक्के जाणायला हवे की, मानवाकरता निसर्ग, मानवाकरता धर्म (प्रत्येक गोष्ट ही मानवाची भोग्य चीज आहे) ही आजची बेगुमान धारणा आहे. धर्माकरता मानव ही सनातन धर्माची धारणा आहे; म्हणूनच जातीसंस्था, विधीनिषेध ही कवचकुंडले अपरिहार्य आहेत.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०१९)
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे आध्यात्मिक कुळ आणि त्यांच्या वडिलांचा पत्नीविषयीचा दृष्टीकोन‘एकदा एकाने प.पू. गुरुदेवांना प्रश्न केला, ‘आपण योगीराज आहात. आपला जन्म योग्याच्या कुळातील आहे ना ?’ गुरुदेव लिहितात, ‘या प्रश्नाचे उत्तर देऊ नये’, असे वाटत होते. विचारलाच आहे, तर सांगतो, ‘मी योगी आहे किंवा नाही, हे मला ठाऊक नाही; पण माझे कुळ मात्र योग्याचे आहे. माझे वडील बाळशास्त्री काटे हे योगी होते. त्यांनी जीवनभर योगसाधना केली, उपासना केली. त्यांची श्रीकृष्णाची उपासना होती. भागवत सप्ताह वर्षातून एकदा तरी व्हायचाच, कधी अनेकही व्हायचे. भाद्रपदातील ‘भागवत सप्ताह’ हा अखंड ४० वर्षे वडिलांच्या मृत्यूपर्यंत होत होता. पहाटे ४ ते १० पर्यंतची प्रतिदिनची योगसाधना मरेपर्यंत सतत होत होती. नेम कधी टळला नाही. शरीर अस्वस्थ किंवा अंथरुणावर असेल तेव्हाच काही थोडे अपवाद ! आई जुन्या वळणाची, व्रते आचरायची. पतीसेवेचे व्रत तर अखंड होतेच. तिची अंगकाठी सडपातळ होती. चेहर्यावर गौर कांती होती. डोळे विलक्षण पाणीदार होते. अंगकांती, रूप योगिनीचे होते. योग्याच्या तोडीचीच योगिनी होती. बाळशास्त्री काटे ‘वर्णाश्रम धर्म सभे’चे हे विदर्भातील अध्यक्ष होते. त्यांच्या जीवनातील एकच प्रसंग सांगतो. काशीला त्यांचा सत्कार होता. ‘अखिल भारतीय वर्णाश्रम धर्म सभे’चे अध्यक्ष लक्ष्मणशास्त्री द्रविड यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार होता. बाळशास्त्री यांच्याबरोबर त्यांची पत्नी होती. बाळशास्त्री योगी होते. सुंदर शरीरयष्टी, तेज:पुंज कांती ! पत्नी त्यामानाने थकलेली ! तिच्यावर वृद्धपणाचे सावट होते. व्यासपिठावर बाळशास्त्री होते आणि बाजूला त्यांच्या पत्नी होत्या. अध्यक्ष होते, कार्यवाहक होते. कार्यवाहकांनी ओळख करून दिली, ‘महापंडित आणि योगीराज बाळशास्त्रींचा बहुमान करण्याचा हा आनंदाचा प्रसंग ! भाग्याने त्यांच्या मातोश्री इथे उपस्थित आहेत.’ बाळशास्त्रींची पत्नी ही पत्नीसारखी दिसत नव्हती, मातेसारखी दिसत होती ! अध्यक्ष चरकले. अध्यक्षांनी कार्यवाहकांची चूक दुरुस्त केली. ते म्हणाले, ‘बाळशास्त्रींच्या या माता नाहीत, पत्नी आहेत.’ बाळशास्त्री बोलण्यास उभे राहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘कार्यवाहकाने योग्यच सांगितले आहे. आता ही माझी पत्नी नाही. पत्नी होती, मुलगा होण्याआधी. आता माता आहे. मुलगा झाला की, पत्नी माता होते. ही माझी माताच आहे. त्यांनी भार्या (पत्नी) शब्दाची योग्य व्याख्याही केली.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८) |