रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या साधना शिबिराला जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर मुंबई येथील कु. श्रुती पवार यांना जाणवलेली सूत्रे
‘१७ ते २१.११.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या ‘युवा साधना शिबिरा’च्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळण्यासाठी प्रार्थना करणे
मी नेहमी प्रार्थना करायचे, ‘डॉक्टरबाबा, (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) मला रामनाथी आश्रमात येण्याची संधी कधी मिळणार ? प.पू. डॉक्टर मलाही इतरांप्रमाणे आश्रमात शिबिराला येण्याची संधी द्या.’
२. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी साधिकेला ‘आता केवळ सेवा, नामजप आणि अभ्यास करायचा’, असे सांगणे
थोड्याच दिवसांनंतर मी ठाणे सेवाकेंद्रात गेले. तेथे मी सद्गुरु अनुराधा वाडेकर (सद्गुरु ताई) यांना भेटले. तेव्हा सद्गुरु ताईंनी मला विचारले, ‘‘तू रामनाथीला जाऊन आलीस का ?’’ तेव्हा मी त्यांना ‘‘मी गेले नाही’’, असे सांगितले. त्यावर सद्गुरु ताईंनी सांगितले, ‘‘आता केवळ सेवा, नामजप आणि अभ्यास करायचा.’’
३. नियमित नामजप, भावप्रयोग आणि आत्मनिवेदन चालू केल्यावर थोड्याच दिवसात रामनाथी आश्रमात शिबिराला जाण्याचा निरोप मिळणे
घरी आल्यावर ‘मी कुठे अल्प पडते ?’ याचे चिंतन केले आणि तेव्हापासून नियमितपणे नामजप, भावप्रयोग आणि आत्मनिवेदन चालू केले अन् थोड्याच दिवसांनी मला रामनाथी आश्रमात एका शिबिराला येण्यासाठी निरोप मिळाला.
४. रामनाथी आश्रमात येत असतांना मला पुष्कळ आनंद होत होता आणि माझा नामजप अखंड चालू होता.
५. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती
अ. रामनाथी आश्रमात आल्यापासून मला साधकांमध्ये प.पू. डॉक्टर दिसू लागले.
आ. व्यासपिठावर विराजमान होणार्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे सुदर्शनचक्र हातात धरलेला श्रीकृष्ण दिसत होता.
इ. येथे घेतलेले प्रत्येक ध्येय हे गुरुदेवांचा संकल्प असल्यासारखे वाटत होते.
ई. आश्रमात आल्यापासून पुष्कळ शांत वाटून आनंदी आणि उत्साही वाटू लागले.
उ. ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी मला डोळ्यांसमोर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तेथे उपस्थित आहेत’, असे दृश्य दिसले.
ऊ. मला ‘आश्रमातून घरी जाऊच नये’, असे वाटते.’
६. शिबिरात घेतलेला भावजागृती प्रयोग
‘आपण सर्वजण डोळे मिटूया. भगवान श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या चरणी प्रार्थना करूया, ‘तुम्हीच आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित असा भावप्रयोग करून घ्या.’ आपण सर्वजण गोपगोपी होऊन साक्षात् जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गोकुळात जात आहोत. आपण गोकुळाकडे मार्गक्रमण करत आहोत. मार्गाने जातांना आपण श्रीकृष्णाचे नाम घेत एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. आपल्या प्रत्येक पावलागणिक आपल्या अनेक जन्मांतील पापे नष्ट होत आहेत. आपण मार्गाने जात असतांना वृक्ष, वेली, पाने, फुले आणि साक्षात् पवनदेवसुद्धा आपल्याकडे कौतुकाने पहात आहेत. ते जणू म्हणत आहेत की, या सर्व गोपगोपींना आज साक्षात् भगवंताचे दर्शन होणार आहे; म्हणून तेही आज भावविभोर झाले आहेत.
आपण सर्वजण आतुरतेने श्रीकृष्णाला आळवण्यासाठी आणि त्याला अंतरात विराजमान करण्यासाठी धावतच गोकुळाकडे जात आहोत. आपण गोकुळात पोचलो आहोत. समोर एक भव्य महाल आहे. त्याच्या महाद्वारासमोर चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रे आणि तारे ‘भगवान श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे’, यासाठी आतूरतेने उभे आहेत. आपण महालाच्या महाद्वारावर पोचलो आहोत आणि भगवंताला आळवत आहोत. आपली प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोचत आहे आणि भगवंत आपल्या आर्ततेने मारलेल्या हाकेचा आवाज ऐकून महाद्वार हळूहळू उघडत आहेत. त्या महाद्वारातून संपूर्ण चैतन्याने भारीत असे पिवळे सोनेरी किरण सर्व गोपगोपींवर आशीर्वाद रूपाने पडत आहेत. आपण नमस्कार करून उंबरठा ओलांडत आहोत.
समोर बघतो, तर साक्षात् श्रीकृष्ण, आपला गोविंद आपल्यासमोर उभा ठाकला आहे. तो स्मित करत आपणा सर्वांकडे पहात आहे. आपण धावत जाऊन त्याचे चरणकमल घट्ट पकडले आहेत आणि अंतःकरणांतून त्याला प्रार्थना करत आहोत, ‘हे गोविंदा, सर्व तीर्थे तुझ्या चरणांशी आहेत. माझे सर्वस्व या चरणांशी आहे. हे मुरारी, हे चरणच माझा एकमात्र आधार आहेत. भगवंता, तू आहेस; म्हणून मी आहे. हे श्रीधरा, माझा प्रत्येक श्वास तुझ्या कृपेमुळेच चालू आहे. हे श्रीकृष्णा, माझ्याकडून सर्व सुटले, तरी चालेल; परंतु तुझे चरणकमल माझ्या हातून कधीच सुटू नयेत. हे श्रीधरा, या चरणकमलांना मी मारलेली मिठी कधीच सुटू नये. धर्मसंस्थापना करण्यासाठी हे चक्रधारी, तू आम्हाला शक्ती दे, भक्ती दे, बळ दे, चैतन्य दे.’ आपला प्रत्येक शब्द भगवान श्रीकृष्ण अगदी मन लावून ऐकत आहे आणि सर्व गोपगोपींना आशीर्वाद देऊन ‘तथास्तु ऽऽ तथास्तु।’, असे म्हणत आहे. ‘श्रीकृष्णाच्या चरणांना मारलेली घट्ट मिठी अशीच शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे’, अशी प्रार्थना करून या भावामध्येच स्थिर होऊया. सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करूया.’
श्रीकृष्णार्पणमस्तु।
– कु. श्रुती पवार, मुंबई (१६.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |