रुग्णालयात गेल्यावरही स्थिर आणि शांत असणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर !
कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीमती निर्मला सारंगधर (पत्नी, वय ५५ वर्षे), कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.
१ अ. यजमानांच्या मृतदेहाने नामजप करण्यास सांगितल्याने पत्नीला स्थिर आणि शांत वाटणे : ‘यजमानांचा (कै. दिलीप सारंगधर यांचा) मृतदेह घरी आणल्यावर सर्वांनी मला त्यांचे अंत्यदर्शन घेण्यास सांगितले. तेव्हा ‘त्यांच्याकडे बघितल्यावर ते मला नामजप करण्यास सांगत आहेत’, असे जाणवले. तसेच ‘मी नामजप करत आहे. तूही नामजप कर’, असे मला सांगत असल्याचे जाणवत होते. तेव्हा मला आतून पुष्कळ स्थिर आणि शांत वाटत होते.’
२. सौ. काव्या दुसे (मोठी मुलगी), कोल्हापूर सेवाकेंद्र
२ अ. बाबांना अतीदक्षता विभागात भरती केल्यावर ‘केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना सांभाळणार आहेत’, असे जाणवणे : ‘बाबांना अतीदक्षता विभागात भरती केल्यावर माझ्या मनात ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) त्यांना सांभाळणार आहेत’, असा विचार होता. मला सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी नामजप करण्यास सांगितला. त्याप्रमाणे माझ्या प्रार्थना आणि नामजप होत होता.
२ आ. नामजप चालू केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांनी साधिकेच्या हृदयाचे ठोके वाढणे आणि नंतर मन स्थिर होणे, मोठे युद्ध जिंकले असून अंतरात आनंद अनुभवता येणे अन् काही वेळातच बाबांचे निधन झाल्याचे समजणे : नामजप चालू केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांनी माझ्या हृदयाचे ठोके वाढत गेले; पण मनात नकारात्मक विचार येत नव्हते. वीस मिनिटानंतर माझ्या हृदयाचे ठोके स्थिर झाले. त्या वेळी ‘मी मोठे युद्ध जिंकले आहे’, अशी भावना मनामध्ये उमटत होती आणि त्याचा आनंद मला अंतरात अनुभवता येत होता. तेव्हा मनात असाही विचार येऊन गेला की, ‘बाबा आता आनंदात विलीन झाले आहेत.’ त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत मला भ्रमणभाष आला की, बाबांचे निधन झाले आहे.
२ इ. बाबांजवळ अतीदक्षता विभागामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले पांढर्या वेशभूषेत उभे असून बाबांनी त्यांच्या हातात हात दिल्याचे दिसणे : बाबांचे निधन झाल्यानंतर मी गुरुदेवांना आत्मनिवेदन केले. मी डोळे मिटल्यावर मला असे दिसले की, बाबांच्या जवळ अतीदक्षता विभागामध्ये गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) पांढर्या वेशभूषेत लख्ख प्रकाशात उभे आहेत. त्यांनी हात पुढे केला आहे आणि बाबांनी त्यांच्या हातात हात दिला.
३. श्री. प्रसाद सारंगधर (लहान मुलगा), कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.
३ अ. रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर स्थिर आणि शांत असणे : ‘मी बाबांना रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर प्रारंभी ते अगदी ‘त्यांना काही झालेच नाही’, अशा पद्धतीने ते स्वतः ‘स्ट्रेचर’वर जाऊन झोपले. त्या वेळी बाबा पुष्कळ स्थिर आणि शांत होते. प्रत्यक्षात त्या वेळी आधुनिक वैद्यांनी त्यांना एक हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येऊन गेला असल्याचे सांगितले.
३ आ. ‘मृत्यूकडे साक्षीभावाने पहात असून त्यांनी मृत्यू आनंदाने स्वीकारला आहे’, असे वाटणे : थोड्या वेळाने त्यांना अतीदक्षता विभागात नेल्यानंतर तेथील आधुनिक वैद्य त्यांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न करत होते, ते बघून मला पुष्कळ भीती वाटली. त्या वेळी जणू ‘परम पूज्य डॉक्टरच मला सांभाळत आहेत’, याची प्रकर्षाने मला जाणीव झाली आणि त्यांचे अस्तित्व मला माझ्या समवेत जाणवले. बाबांकडे बघतांना ते ‘मृत्यूकडे किती साक्षीभावाने बघत आहेत आणि मृत्यू आनंदाने स्वीकारला आहे’, असे मला वाटले.
४. श्री. किरण दुसे (जावई), कोल्हापूर
४ अ. अंत्यदर्शन घेतांना चेहरा शांत आणि समाधानी दिसणे : ‘श्री. दिलीप सारंगधर यांचे निधन झाले’, असे आम्हाला समजल्यावर प्रारंभी ‘अशी घटना घडलीच नाही’, असे वाटत होते. दुसर्या दिवशी कोपरगाव येथे पोचल्यावर बाबांचे अंत्यदर्शन घेतले. त्या वेळी ‘त्यांच्या चेहर्याकडे पाहून ते शांत निद्रेत गेले आहेत’, असे जाणवले. ‘मृत्यूसमयी त्यांच्या मनात कुठल्याही इच्छा शिल्लक राहिल्या नाहीत’, असे मला जाणवत होते. त्यामुळे त्यांचा चेहरा अतिशय समाधानी असल्याचे जाणवले.
४ आ. शेवटी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत श्रद्धांजली वाहिली. त्या वेळी हा नामजपही भावपूर्ण झाला असल्याचे जाणवले.
४ इ. श्री. दिलीप सारंगधर यांच्या मृतदेहाला ‘अमरधामकडे (स्मशानभूमीत) नेतांना ‘त्यांचा देह कुठेतरी अन्य लोकात जात असून आम्ही त्या मिरवणुकीत सहभागी झालो आहोत’, असे मनाला वाटत होते.’
सर्व सूत्रांचा दिनांक (२.४.२०२४)
मनमिळाऊ आणि सर्वांचा आधार असणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील (कै.) दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !
(कै.) दिलीप सारंगधर यांची मुलगी सौ. काव्या दुसे हिला तिच्या वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. ‘बाबा मनाने अतिशय निर्मळ असून मनमिळाऊ होते.
२. अपेक्षा नसणे : बाबांना कुठलाही पदार्थ करायचा किंवा त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल, तर तुला जे आवडेल ते घे किंवा माझ्यासाठी घेणे आवश्यक आहे का ते ठरवून घे. त्यांना कुटुंबियांकडून कोणतीही अपेक्षा नसते.
३. मुलांना स्वावलंबी बनवणे : त्यांनी मला घरातील सर्व गोष्टी शिकण्यासाठी उद्युक्त केले. तसेच माझ्या भावालाही स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले. ‘स्वतःची कामे स्वतः करणे, गाडी शिकून घेणे, वीजदेयक भरणे, शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये स्वतः प्रवेश (ऍडमिशन) घ्यायला शिकवणे, शाळेत ‘फॉर्म’ कसा भरायचा ? किंवा पैसे तसेच इतर माहिती कशी गोळा करायची ?’, हे ते समवेत राहून त्याला शिकवत असत.
४. अध्यात्माच्या समवेत व्यवहारातीलही सर्व मुलांना शिकवणे : व्यवहारातील नियमित लागणार्या गोष्टींचा अभ्यास करणे, कुठली गोष्ट कुठे चांगली मिळू शकते, चांगल्या दर्जाची आणि ‘ती पुढे कुठे वापरता येईल’, याचा अभ्यास करणे, अध्यात्माच्या समवेत अशा व्यवहारिक अनेक गोष्टी ते शेवटपर्यंत शिकवत राहिले आणि त्यांच्या नकळत होणार्या कृतींतूनही ते आम्हाला शिकवत होते.
५. सकारात्मक आणि समाधानी रहाण्यास मुलांना सांगणे : बाबा आम्हाला (मला आणि माझा भाऊ प्रसाद याला) नेहमी सकारात्मक रहाण्यास सांगायचे. आपल्याला जे देवाने दिले आहे, त्यात समाधानी रहायला सांगायचे.
६. आईची सेवा संतसेवा या भावाने करणे : माझी आजी आजारी असतांना ‘आपल्या घरात संत आहेत’, या भावाने आई, बाबा आणि भाऊ यांनी तिची मनापासून सेवा केली. आजीचे चार वर्षे सर्व अंथरुणावर करावे लागत होते. काही वेळा आजीचे शौच स्वच्छ करण्याची कृतीही बाबांनी सेवाभावाने केली आहे.
७. आईच्या माहेरीही सर्वांची मने जिंकून घेणे : बाबा स्वतःच्या सासरी, म्हणजेच आईच्या माहेरीही गेल्यावर ‘तिच्या माहेरच्या माणसांनी त्यांचा जावई म्हणून मानपान करावा’, अशी कोणतीही अपेक्षा मी पाहिली नाही. तेथेही ते सहजतेने रहायचे, तसेच तेथे गेल्यावर ते स्वयंपाकघरात साहाय्य करायचे. नवीन नवीन पदार्थ करून सर्वांना खाऊ घालायचे आणि सगळ्यांचे मन जिंकून घ्यायचे.
८. पूर्णवेळ साधकाविषयी आदर असणे : मी आणि माझे यजमान श्री. किरण दुसे आम्ही दोघे कोल्हापूर येथे पूर्णवेळ साधना करत आहोत. बाबांसाठी आम्ही काही आणले, तर ते त्यांना फारसे आवडायचे नाही. त्यांनी मला एकदा सांगितले, ‘‘तुम्ही दोघे पूर्णवेळ आहात. खरं तर आम्ही तुमच्यासाठी करायला पाहिजे. तुम्हाला काही लागले, तर ते मला सांगा. तेवढेच माझे अर्पण होत जाईल.
९. सासूबाईंचे भाऊ रक्षाबंधन किंवा भाऊबीज या दिवशी येत नसल्याने त्यांना बहीण मानून त्यांच्याकडून औक्षण करून घेऊन त्यांना आनंद देणे : माझा विवाह झाल्यानंतर एकदा सहज बाबांशी बोलत असतांना मी त्यांना सांगितले, ‘‘माझ्या सासूबाईंचे भाऊ त्यांना रक्षाबंधन किंवा भाऊबिजेला भेटायला येत नाहीत. त्यामुळे आईंना वाईट वाटते.’’ हा प्रसंग लक्षात ठेवून माझ्या विवाहानंतरच्या पहिल्या दिवाळीपासून ते सलग चार वर्षे न चुकता मला माहेरी नेण्याच्या निमित्ताने यायचे आणि भाऊबिजेच्या दिवशी सासूबाईंकडून औक्षण करून घ्यायचे. बाबांनी माझ्या सासूबाईंना बहीण मानले होते. त्यामुळे ‘सासूबाईनांही गुरुदेवांनी माझ्यासाठी आध्यात्मिक भाऊ पाठवला’, याचा आनंद मिळायचा.
१०. मुलीच्या सासूबाईंची गंभीर स्थिती चांगली झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे : ‘माझ्या सासूबाई गंभीर आजाराने रुग्णालयामध्ये आहेत’, असे कळल्यानंतर त्यांना तातडीने भेटायला बाबा अमरावती येथे आले होते. सासूबाईंना नागपूर येथे स्थानांतर केल्यानंतरही १८ घंट्यांचा प्रवास करून ते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले. रुग्णालयात त्यांची स्थिती चांगली झालेली बघितल्यावर त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. गुरुदेवांच्या चमत्काराविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. सासूबाईंना ‘हा चमत्कार केवळ गुरुदेवच करू शकतात’, असे ते वारंवार ते सांगत होते.
११. कुणी कौतुक केल्यास श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणे : सासूबाई रुग्णालयात असतांना त्यांनी बाबांना सांगितले की, ‘‘तुमच्या मुलीने माझी मनापासून सेवा केली. तुम्ही जसे तुमच्या आईची सेवा केली, तसेच तिच्यामध्ये ते गुण रुजले आहेत. त्यामुळे तिने माझी मनोभावे सेवा केली. हे ऐकल्यानंतर बाबांनी सांगितले, ‘‘हे माझे गुण नाहीत. हे सर्व गुरुदेवांनी करून घेतले. तुमच्या सेवेतून तिची संत सेवा झाली. यात माझे काही श्रेय नाही.’’
१२. सर्वांना आधार वाटणे
अ. घर किंवा समाज यांतील लोकांच्या समवेत वयाचे कुठलेही बंधन न ठेवता, लहान मुलांच्या समवेत लहान होऊन जाणारे आणि मोठ्यांना आधार वाटणारे असे होते.
आ. कोरोना महामारीच्या वेळी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी ‘दिलीप आमच्या येथे रुग्ण म्हणून आहे, हे आमचे भाग्यच आहे’, असे बोलून दाखवले; कारण तो असल्याने ‘जनरल वॉर्ड’मध्येही गंभीर वातावरण न रहाता आनंदाचे वातावरण असायचे. तेथील परिचारिका आणि आधुनिक वैद्यही म्हणायचे, ‘‘दिलीप असल्यामुळे रुग्णांच्या कक्षात यायला चांगले वाटते. त्याच्यामुळे सगळे रुग्ण आनंदाने रहात आहेत.’’
१३. शिकण्याच्या स्थितीत असणे : मला चित्रकलेची आवड होती. तसेच वाद्य वाजवण्याचीही आवड होती. त्यातही त्यांनी कधी आडकाठी आणली नाही. स्वतःही शेवटपर्यंत शिकण्याच्या स्थितीत राहिले. ‘या सर्व गोष्टींचा लाभ मला आता आश्रम जीवनात होत आहे’, याबद्दल मला बाबांविषयी आजही कृतज्ञता वाटते.
– सौ. काव्या किरण दुसे, कोल्हापूर सेवाकेंद्र (२.४.२०२४)