सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या रथोत्सवाच्या वेळी नृत्य करण्याची सेवा करतांना गोवा येथील वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांना आलेल्या अनुभूती

२२.५.२०२२ या दिवशी निघालेल्या रथोत्सवात मला नृत्य करण्याची सेवा मिळाली. त्याविषयी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सकाळी स्नानासाठी जातांना कोकिळेचे सुमधुर स्वर कानावर पडणे

२२.५.२०२२ या दिवशी सकाळी स्नानासाठी जातांना कोकिळेचे सुमधुर स्वर माझ्या कानावर पडले. त्या वेळी ‘आज गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) जन्मोत्सवानिमित्त कोकिळाही तिचा आनंद व्यक्त करत आहे’, असे मला वाटले.

२. नृत्य करतांना देवासमोर बालकभावात राहून देहभान हरपून नृत्य करण्याचे ठरवणे

वैद्या (कु.) शर्वरी बाकरे

जन्मोत्सवानिमित्त निघणार्‍या रथोत्सवात मला नृत्य करण्याची सेवा मिळाली होती. नृत्य करतांना मी ‘देवासमोर बालकभावात राहून देहभान हरपून नृत्य करायचा’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी घागरा घातला, त्या वेळी ‘मी पू. (सौ.) उमा रविचंद्रन (सनातनच्या ७० व्या (समष्टी) संत) यांच्या चित्रांमधील बालकभावातील बालिका आहे’, असे मला वाटत होते. मला ‘आनंदाने उड्या मारूया’, असे वाटत होते. प्रत्यक्षात साधकही मला त्या वेशभूषेत पाहून म्हणाले, ‘‘तू लहान बालिकाच वाटत आहेस.’’

३. रथोत्सवासाठी उभे राहिल्यावर साधकांना पाहून भावजागृती होणे

रथोत्सवाच्या पूर्वसिद्धतेच्या अंतर्गत सर्व साधक रांगेत उभे होते. सर्वांना ‘ही दिंडी आहे’, असेच ठाऊक होते. त्या वेळी सर्व साधकांना पाहून माझी भावजागृती होत होती.

४. गुरुदेवांच्या समोर नृत्य करता न येण्यामागील विचार देवानेच दूर करणे

रथोत्सवात माझे नृत्यपथक रथाच्या मागे होते. त्या वेळी मनात विचार आला की, ‘मी गुरुदेवांच्या समोर नृत्य करण्याची संधी गमावली. त्यामुळे देवाची माझ्यावर दृष्टी कशी पडणार ?’ त्यानंतर माझ्या मनात विचार आला की, देवाने ही संधी दिली आहे, त्याप्रती कृतज्ञ राहून ती कृतज्ञता टिकवून ठेवायला हवी. देव चराचरात आहेच. ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाला हात धरून घेऊन जातांना, जाणारा पुढे असतो आणि हात धरलेला मुलगा त्याच्या मागे असतो. आपलेही तसेच आहे. या रथोत्सवातही देव माझ्या पुढे आहे आणि त्याने माझा हात पकडला आहे; म्हणून ‘मी त्याच्या मागे आहे’, असा विचार आला आणि मला रडू आले. त्या वेळी अंतरात होती, ती केवळ कृतज्ञता !

५. नागेशी येथे दिंडी काही कालावधीसाठी थांबली असतांना गुरुदेवांचे जवळून दर्शन होणे

नागेशी येथे काही कालावधीसाठी दिंडी थांबली होती. त्या वेळी भगवंताचा (गुरुदेवांचा) रथ आमच्या उजव्या बाजूला थांबला होता. त्या वेळी भगवंताचे ते रूप मला अगदी जवळून पहाता आले. देवाला डोळे भरून पहात असतांना माझा भाव जागृत होत होता. मला आजूबाजूचे काहीच भान नव्हते. त्या वेळी केवळ भगवंताची आपल्यावरील कृपा आणि देवाचे ते रूप पहातांना आपोआपच भाव जागृत होऊन रडायला येत होते. त्या वेळी माझ्या मनात काहीच नव्हते. ते क्षण माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण होते. आमचे जीवन कृतार्थ झाले. ‘साक्षात् भगवंत त्याचे दर्शन देण्यासाठी दारी आला’, या विचाराने माझी भावजागृती होत होती.

६. ‘गुरुदेवांची स्वतःवर दृष्टी पडावी’, ही इच्छाही पूर्ण होणे

नागेशी येथे मी गुरुदेवांचे रूप पाहून भावविभोर झाले. मला स्वतःची जाणीव नव्हती. त्या वेळी गुरुमाऊलीने २ वेळा वाकून आमचे नृत्य पथक होते, तेथे पाहिले आणि त्यांची दृष्टी माझ्यावर पडली. त्यांनी आमच्या दिशेला नमस्कार केला. त्यानंतर तिसर्‍यांदा त्यांनी वाकून माझ्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, ‘‘किती दागिने घातले आहेत ना !’’ त्यानंतर माझा आनंद गगनात मावेना. अश्रूंना बांधच फुटला होता. गुरुदेवांचे ते सुंदर मनोहर रूप डोळ्यांत साठवून घेत आम्ही सर्वांनी परत रथोत्सवातील दुसर्‍या सत्राला आरंभ केला.

रथोत्सवाच्या वेळी झालेली भावजागृती आणि अन्य वेळी होणारी भावजागृती

७. ‘वातावरण पृथ्वीवरील नसून विष्णुलोकातील आहे’, असे जाणवणे

रथोत्सव दुपारी ४ वाजता चालू झाला आणि ६ वाजता संपला. हा कालावधी कधी संपला, हे मला कळलेच नाही. तसेच फेरीच्या वेळी वातावरण वेगळेच जाणवत होते. ‘हा रथोत्सव पृथ्वीवरील नसून विष्णु लोकातील आहे. श्रीविष्णूच्याच कृपेने आम्ही सर्व अनुभवत आहोत’, असे मला जाणवत होते. ‘देवाच्या समवेत असल्यावर वेळेची जाणीव रहात नाही’, याची अनुभूती मला पुन्हा एकदा घेता आली.

८. प्रार्थना

गुरुदेवांनी त्यांच्या मूळ स्वरूपात दारात येऊन दर्शन दिले आणि आम्हा सर्व साधकजनांना धन्य-धन्य केले. सर्वांच्या जीवनाचे सार्थक झाले. डोळ्यांचे पारणे फिटले. ‘हे कृपाळू गुरुमाऊली, तुझे कृपाछत्र असेच आमच्यावर अखंड राहू दे. हे गुरुदेवा, तू आमच्यासाठी किती करतोस ? त्याची जाणीवही अखंड टिकून राहू दे. आम्हाला केवळ अन् केवळ तुझ्या चरणांशीच रहायचे आहे. ते सोडून आम्हाला काहीच नको. त्याविना अन्य कसलीही इच्छा मनात उत्पन्न व्हायला नको. हे गुरुराया, केवळ तुझ्याच चरणांचा ध्यास लागू दे’, अशी तुझ्या पवित्र कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२५.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक