समुद्रकिनारे आणि ‘पार्टी लाईफ’ यांच्या पलीकडे पर्यटनाला व्यापक स्वरूप देणे आवश्यक ! – सुनील आंचिपाका, संचालक, गोवा पर्यटन विभाग
|
पणजी (गोवा), ३ एप्रिल (वार्ता.) – समुद्रकिनारे (बीच) आणि ‘पार्टी लाईफ’ (मेजवान्या करणे) यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या पर्यटनाला व्यापक रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, आस्थापने यांच्यासह जनतेच्या मानसिकतेतही पालट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या माध्यमातून ‘हिंटरलँड टूरिझम्’ (ग्रामीण पर्यटन), ‘अॅडव्हेंचर टूरिझ्म’ (साहनी पर्यटन), ‘स्पिरिच्युअल टूरिझम्’ (आध्यात्मिक पर्यटन) आदींना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्धार गोवा पर्यटन विभागाचे संचालक ‘आय.ए.एस्.’ अधिकारी सुनील आंचिपाका यांनी व्यक्त केला. ते गोवा राज्य पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित ‘गोवा आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्ट २०२४’ या २ दिवसांच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. हा कार्यक्रम ताळगाव येथील ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम’मध्ये ३ एप्रिलला चालू झाला.
सौजन्य Goa Tourism
३ एप्रिलच्या सकाळी झालेल्या सत्रात ‘रिजनरेटिव्ह टुरिझम्’ (टीप) या विषयावरील परिसंवाद पार पडला. या परिसंवादाला सुनील आंचिपाका यांच्यासह गोवा कला आणि संस्कृती विभागाचे संचालक सगुण वेळीप आदी अधिकारी, तसेच पर्यटनाशी संबंधित आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी यांनीही संबोधित केले. सर्व वक्त्यांनी गोव्यात पुनरुत्पादक आणि शाश्वत पर्यटनावर भर देणार असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे हेही थोडा वेळ उपस्थित होते. या मेळ्यात भारतासह व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, नेपाळ, अमेरिका, वेस्ट इंडिज, आफ्रिकी देश आदी विविध ठिकाणांहून पर्यटन क्षेत्राशी निगडित आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
MasterCard International Inc signs Memorandum of Understanding with GoaTourism which will boost Goa as a Top Tier Tourist Destination on their uniquely positioned Priceless India platform.@TourismGoa @mastercardindia pic.twitter.com/gDWfMpP5RY
— Rohan Khaunte (Modi Ka Parivar) (@RohanKhaunte) April 4, 2024
या वेळी गोवा पर्यटन खाते आणि या क्षेत्राशी निगडित संस्था यांच्यामध्ये झालेल्या काही सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. यांमध्ये ‘मास्टरकार्ड’, ‘फ्लाय ९१’, ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’, ‘आयर्नमॅन’ आणि ‘अगोडा’ या संस्था अथवा आस्थापने यांचा समावेश होता.
(टीप :रिजनरेटिव्ह टुरिझम् म्हणजे पर्यटनस्थळाशी संबंधित नैसर्गिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सकारात्मक दूरगामी परिणाम होण्यासाठी केलेले सर्वसमावेशक प्रयत्न !)
पुनरुत्पादक पर्यटनावर लक्ष केंद्रित करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य !
‘गोव्याचे पर्यटन क्षेत्र हे ‘सन, सँड अँड सी’ (सूर्य, वाळू आणि समुद्र) एवढ्यापुरते सीमित नाही. समुद्रकिनार्यांपासून दूर असलेला ग्रामीण गोवा, गोव्याची परंपरा, आध्यात्मिक पर्यटन, येथील विविधतेने नटलेली संस्कृती, गोव्याचे आदरातिथ्य इत्यादींचे दर्शन पर्यटकांना करून देणे महत्त्वाचे आहे. पुनरुत्पादक पर्यटनावर लक्ष केंद्रित करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहेे. गोव्याच्या पूर्वेकडील सह्याद्रीचे खोरे, अभयारण्य, नैसर्गिक सौंदर्य यांकडे पर्यटकांना आकर्षित केले पाहिजे. गोव्यातील स्थानिक लोकांशी संपर्क, गोव्यातील लोकांमध्ये इतरांविषयी असलेली आपुलकी, स्थानिक पातळीवर साधनसुविधांची निर्मिती, स्थानिक कलांना वाव देणे आदी झाले पाहिजे, असे मतही तज्ञांनी व्यक्त केले.