कलाकार व्यसनाधीन झाल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम आणि कलाकाराने स्वतःच्या अन् श्रोत्यांच्या हितासाठी साधना करण्याचे महत्त्व !
‘मी सतारवादक आहे. मी कलाक्षेत्रात काम करत असतांना कलाकाराला लागलेले व्यसन जवळून पहाण्याचे प्रसंग मला पहायला मिळाले. समाजातील बहुतांशी कलाकार व्यसनांच्या आहारी जातात. ‘कलाकार व्यसनाच्या आहारी का जातो ?’, याविषयी विचार करत असतांना ‘कलाकार, त्याचे व्यसन आणि त्यावरील उपाय’ यांविषयी सुचलेले विचार येथे दिले आहेत, तसेच ‘व्यसनामुळे होणारी कलाकाराची हानी आणि साधना करणार्या कलाकाराला साधनेमुळे होणारे लाभ’ यांविषयीचे विचार येथे दिले आहेत.
१. संगीत कलेचा उगम हा ईश्वराची आराधना करण्यासाठी झाला असणे आणि कालप्रवाहात संगीताचे ‘मार्गी संगीत’ आणि ‘देशी संगीत’ या २ प्रकारांत विभाजन होणे
संगीत कलेचा उगम ईश्वराची आराधना करण्यासाठीच झाला आहे. प्राचीन काळी कलेचे सादरीकरण देऊळ आणि मठ अशा सात्त्विक ठिकाणी होत होते. कालप्रवाहात संगीताचे २ प्रकारांत विभाजन झाले. एक म्हणजे मार्गी संगीत (टीप १) जे ईश्वराची आराधना करण्यासाठी सादर केले जात असे आणि दुसरे देशी संगीत (टीप २) जे लोकांच्या मनोरंजनासाठी सादर केले जात असे.
टीप १. मार्गी संगीत : वेदकालीन समाजजीवनात यज्ञयागादी प्रसंगी सामगायनाप्रमाणे गायल्या जाणार्या गायनास ‘मार्गी संगीत’ म्हणत. ‘मोक्षप्राप्ती आणि त्यासाठी ईश्वराला प्रसन्न करून घेणे’, हा मार्गी संगीताचा उद्देश होता.
टीप २. देशी संगीत : देशातील विविध भागांतील वेगवेगळ्या समाजांतील चालीरिती, रुढी, सणवार आणि धार्मिक संकल्पना इत्यादींवर आधारित असलेली पारंपरिक गीते, तसेच लोकगीते, म्हणजे ‘देशी संगीत’ होय. ‘देशी संगीत’ देशातील अनेक भाषा, तसेच लोकभाषा यांमध्ये रचलेले असते.
२. ‘मार्गी संगीता’त देवाप्रती भाव महत्त्वाचा असणे आणि ‘देशी संगीता’त मनोरंजनाकडे लक्ष दिले जाणे
‘मार्गी संगीत’, म्हणजेच ईश्वराची आराधना करण्यासाठी सादर करायच्या संगीतात देवाप्रती असलेल्या भावाला महत्त्व आहे. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी असलेल्या ‘देशी संगीता’त पारंपरिक लोकसंगीत सादर केले जात असे. यात लोकांच्या आवडी-निवडीच्या दृष्टीने विविध वाद्ये, नवनवीन गीत प्रकार, तसेच कलाकाराची वेशभूषा आणि केशभूषा अशा बाह्य गोष्टींवर लक्ष दिले जात असे.
३. पालटणार्या काळानुसार ‘कला’ हे उदरनिर्वाहाचे साधन बनून त्याला व्यावसायिक रूप येणे
पालटणार्या काळानुसार ‘कला’ हे उदरनिर्वाहाचे साधन होऊन पुढे त्याला जसजसे व्यवसायाचे स्वरूप येत गेले, तसतसे कलेचे बर्याच प्रमाणात व्यावसायिकीकरण होत गेले. कलाकार कला सादर करतांना प्रत्येक वेळी भावस्थिती आणि एकाग्रता साध्य करू शकत नसल्यास राग अन् स्वर यांच्याशी एकाग्रता साधण्यासाठी, कधी अती प्रमाणात केलेल्या सरावामुळे येणारा थकवा घालवण्यासाठी, कधी सराव करतांना किंवा कार्यक्रम करतांना मनात येणारे अनावश्यक विचार घालवण्यासाठी, कधी अन्य कलाकारांच्या आग्रहामुळे, कधी स्पर्धेत टिकून रहाण्याच्या धडपडीच्या नादात, तसेच स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवण्यासाठीही कलाकारांकडून व्यसनांचा आधार घेतला जाऊ लागला. अशा प्रकारच्या कारणांमुळे कलाकारांच्या व्यसनांचे प्रमाण वाढत गेले आणि कलाकार व्यसनात गुरफटला गेला.
धार्मिक शिक्षणाचा अभाव, समाजात अध्यात्माविषयी असलेले अज्ञान, कलाकाराला योग्य गुरूंचे मार्गदर्शन न मिळणे, कलेला साधनेची जोड न देणे इत्यादींमुळे अनेक प्रसंगांत येणारा ताण आणि नकारात्मक विचार विसरण्यासाठीही कलाकार काही वेळा व्यसनांचा आधार घेतात.
४. कलाकार व्यसनाधीन झाल्यास होणारे दुष्परिणाम
४ अ. व्यसनामुळे कलाकाराचे बाह्यमन बधीर होत असणे आणि व्यसनांचे शारीरिक अन् मानसिक दुष्परिणाम होत असणे : कलाकाराने व्यसन केल्यास गायनात पुष्कळ प्रमाणात ताना (टीप ३) म्हणणे आणि दृत लयीत (टीप ४) वादन करणे, या क्रियांमुळे येणारा थकवा त्याला जाणवत नाही.
टीप ३. तान : रागातील स्वरांच्या जलद गतीत केलेल्या विस्तारास ‘तान’ म्हणतात.
टीप ४. दृत लय : एका सेकंदास एक मात्रा यापेक्षा अधिक गती असणार्या लयीस ‘दृत लय’ म्हणतात.
व्यसनामुळे कलाकाराचे बाह्यमन बधीर होते. एकदा शरिराला व्यसनाची सवय लागली की, व्यक्ती त्या व्यसनांच्या अधीन व्हायला लागते. व्यक्तीवर व्यसनांचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. कलाकार तात्पुरती एकाग्रता साधण्यासाठी व्यसनांच्या आहारी जातात.
४ आ. व्यसनामुळे कलाकाराच्या बाह्यमनाचे कार्य तात्पुरते बंद होणे; मात्र त्याच्या अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू तसेच राहिल्याने त्याचा कलेच्या सादरीकरणावर परिणाम होणे : व्यसन केल्याने कलाकाराचे त्याच्या वागण्या-बोलण्यातील दोषांवर नियंत्रण रहात नाही. व्यसनामुळे बाह्यमनाचे कार्य तात्पुरते बंद होते. त्यामुळे कलाकाराला तात्पुरते चांगले (रिलॅक्स) वाटते; मात्र त्याच्या अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू तसेच रहातात. त्यांचा त्याच्या कलेवर परिणाम होतो. हे दुष्परिणाम ठाऊक असूनही कलेला अपेक्षित अशी साधनेची जोड न दिल्याने कलाकार व्यसनांवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत.
५. कलाकाराने साधना करण्याचे महत्त्व
५ अ. कलाकार साधना करत असल्यास गुरुकृपेने त्याला कला श्रोत्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचण्यासाठी व्यसनांचा आधार घ्यावा न लागणे : कलाकार कलेला अध्यात्म आणि साधना यांची जोड देत असल्यास गुरुकृपेने कलाकारातील स्वभावदोष अन् अहं न्यून होत जातो, तसेच ‘नामस्मरण आणि सत्संग’ यांमुळे कलाकाराची वाणी अन् चित्त शुद्ध होत जाते. परिणामी कलाकाराच्या अंतर्मनावर चांगले संस्कार होऊन कलाकाराचे मन निर्मळ होते. साधनेमुळे कलाकार कठीण प्रसंगावर मात करू शकतो. त्यामुळे कलाकाराला त्याची कला स्वतःच्या, तसेच श्रोत्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचण्यासाठी व्यसनांचा आधार घ्यावा लागत नाही.
५ आ. व्यसनाधीन कलाकाराचा आणि साधना करणार्या कलाकाराचा श्रोत्यांवर होणारा परिणाम
१. कलाकाराने व्यसनांच्या आधारे केलेल्या कलेच्या सादरीकरणामुळे त्याच्या अंतर्मनातील हरतर्हेचे गुण-दोष कलेत उतरतात. त्यामुळे श्रोत्यांना कलेचा संपूर्णपणे लाभ कलाकार देऊ शकत नाही. साधना करणार्या कलाकाराच्या अंतर्मनातील निर्मळता आणि एकमार्गी बाहेर पडणारा सात्त्विक भाव कलेच्या माध्यमातून थेट श्रोत्यांच्या अंतर्मनात पोचतो.
२. आध्यात्मिक साधनेने सात्त्विक आणि निर्मळ अंतर्मन बनलेल्या कलाकाराने सादर केलेल्या संगीत कलेच्या माध्यमातून केवळ प्रेममय आणि निर्मळ भाव कलेत उतरतात. साधनेने कलाकाराची अंतर्बाह्य शुद्धी होते. असे संगीत रसिकांच्या बाह्यमनातून उठणार्या वृत्तींना (विविध विचारलहरींना) शांत करून त्वरित त्यांच्या अंतर्मनात पोचते. कलाकाराला आणि श्रोत्यांनाही खर्या अर्थाने कलेचा लाभ होतो.
– श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१.१.२०२४)