सांगवी (जिल्हा पुणे) येथील साधिका सौ. ज्योती अनिल कदम यांना आलेल्या अनुभूती
१. नामजप आणि सेवा केल्याने आनंद मिळणे
‘वर्ष २०२१ मध्ये मी साधनेला आरंभ केला. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून मला कुलदेवतेचा नामजप करण्याचे आणि अध्यात्मप्रचाराची सेवा करण्याचे महत्त्व लक्षात आले. मी तसे करायला आरंभ केल्यापासून मला एक वेगळाच आनंद मिळू लागला. मी साधना करायला लागल्यापासून आमच्या घरातील वातावरणातही पालट झाला.
२. गायीची सुखरूप सुटका होणे
२ अ. गाय व्यायच्या ५ दिवस आधी गायीला त्रास होणे : आम्ही शेतात रहातो. आमच्या घरी ४ – ५ जनावरे आहेत. त्यापैकी एका गायीला वासरू होणार होते. गाय व्यायच्या (गायीला वासरू होण्याच्या) ५ दिवस आधी गायीला त्रास होऊ लागला. ती उठून उभी राहिली, तर तिला बसता येत नव्हते आणि ती बसली, तर तिला उठता येत नव्हते. तेव्हा मला काही सुचत नव्हते. मला भीती वाटू लागली.
२ आ. नामजप करणे आणि गुरुदेवांना प्रार्थना करणे अन् पशूवैद्यांना बोलावणे, त्यांनी ‘गाय या आजारातून वाचेल’, याची खात्री देऊ शकत नाही’, असे सांगणे : गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला सूक्ष्मातून सुचवले, ‘नामजप कर.’ मी गायीभोवती कापराचे मंडल घालणे चालू केले. मी शरण जाऊन गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच आम्हाला या प्रसंगातून बाहेर काढा.’ आम्ही नातेवाइकांचे साहाय्य घेऊन यंत्राने गायीला उठवून बसवत होतो. आम्ही पशूवैद्यांना संपर्क केल्यावर त्यांनी गायीवर उपचार केले. पशूवैद्य आम्हाला म्हणाले, ‘‘गायीची स्थिती पाहून ती या आजारातून वाचेल’, याची मी खात्री देऊ शकत नाही.’’
२ इ. गाय पाचव्या दिवशी स्वतःहून उठून बसणे आणि त्याच रात्री यजमानांना वाईट शक्तींचा त्रास होणे अन् साधिकेने त्यांना नामजप करायला सांगणे : मी ५ दिवस गायीसाठी नामजपादी उपाय केले. गाय पाचव्या दिवशी स्वतःहून उठून बसायला लागली. त्याच रात्री तिला त्रास होऊ लागला. मी तिच्याभोवती मंडल केले आणि नामजप करत बसले. मी गोठ्यात गायीजवळ होते आणि यजमान अन् मुले घरात झोपले होते. यजमान झोपेत मधेच मोठ्या आवाजात ओरडले, ‘‘सोड मला. निघून जा.’’ मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले, ‘‘काय झाले ?’’ ते म्हणाले, ‘‘मला कोणीतरी छातीवर बसून गळा दाबत आहे’, असे जाणवले. मी त्यांना नामजप करायला सांगितला.
२ ई. त्यानंतर १५ मिनिटांनी गायीला काही त्रास न होता ती व्यायली. दुसर्या दिवशी पशूवैद्यांना याविषयी कळल्यावर ते आर्श्चयचकित झाले आणि म्हणाले ‘‘ही देवाचीच लीला आहे. आपल्याला शक्य नव्हते, ते देवाने करून दाखवले.’’
गुरुदेवांनी आम्हाला अध्यात्माचे महत्त्व लक्षात आणून दिले आणि एका कठीण प्रसंगातून बाहेर काढले. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. ज्योती अनिल कदम, सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. (३१.७.२०२३)
|