विलेपार्ले येथे भारतीय सेनेचे शस्त्रास्त्र प्रदर्शन !
सर्वसामान्यांना हाताळता येणार शस्त्रास्त्रे !
मुंबई – पार्ले टिळक विद्यालयाच्या पटांगणामध्ये ६ आणि ७ एप्रिलला भारतीय सैन्यामध्ये वापरल्या जाणार्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे अभूतपूर्व असे प्रदर्शन ‘वीर सेनानी फाऊंडेशन’ आणि ‘पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आहे. येथे येणार्या सामान्य नागरिकांना अनेक शस्त्रे हातात घेऊन न्याहाळता येतील.
या प्रदर्शनात स्वतः सैनिक माहिती सांगतात. त्यांचा त्याग पाहून सर्वसामान्यांच्या भावना उत्कट होतात. ‘येणार्या नव्या पिढीला आपली शस्त्रसज्जता आणि सामर्थ्य यांची माहिती दिली, तर त्यांना राष्ट्राविषयी अधिकच अभिमान वाटेल. या हेतूने प्रत्येक पालकाने आपली मुले, तसेच अन्य कुटुंबीय यांना आवर्जून घेऊन यावे’, असे आवाहन संस्थेने केले आहे.
‘वीर सेनानी फाउंडेशन’ ही संस्था भारतीय सैनिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकांच्या वीरपत्नी, तसेच मुले यांना आर्थिक साहाय्य्य करत असते.
विशेष कार्यक्रमप्रदर्शनाच्या निमित्ताने ६ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये भारतीय संरक्षण विभागातील अनेक आजी-माजी उच्च पदस्थ अधिकारी आणि युद्धशास्त्राचे नामवंत जाणकार भाग घेतील. ७ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी संगीत दिलेल्या विविध गीतांचा ‘स्वतंत्रते भगवती’ हा कार्यक्रम नामवंत गायक सादर करतील. |