उपनिषदांचे पाश्चात्त्य अभ्यासक

‘भारतीय परंपरेमध्ये उपनिषदांचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूंच्या जवळ बसून आत्मकल्याणासाठी ज्ञान मिळवले जाते, त्याला ‘उपनिषद’ असे म्हणतात. उपनिषदांचा रचना काळ इसवी सनपूर्वी १२०० ते ६०० असा समजला जातो. ‘मौक्तिक’ उपनिषदानुसार उपनिषदांची संख्या १०८ आहे; मात्र परंपरेनुसार १० प्रमुख उपनिषदांवर आद्यशंकराचार्यांनी भाष्य लिहिल्यामुळे ती प्रामुख्याने संबोधली जातात. या उपनिषदांचा अभ्यास केवळ भारतीय दार्शनिक विद्वानांनी केला असे नसून परकीय प्राच्यविद्या अभ्यासकांनीही केला आहे.

१. पर्शियन, युरोपीय, लॅटिन आणि फ्रेंच या भाषांमध्ये उपनिषदांचे भाषांतर

दारा शिकोह याने वर्ष १६५७ मध्ये ‘सिरे अकबर’ या शीर्षकाखाली उपनिषदांचा पारशी भाषेमध्ये अनुवाद करून घेतला. या पर्शियन भाषेतील भाषांतराचे अनेक पाश्चात्त्य अभ्यासकांनी युरोपीय भाषांमध्ये भाषांतर केले. अँकवेतील ‘द्यूपेराँ’ या फ्रेंच अभ्यासकाने वर्ष १८०२ मध्ये उपनिषदांचे लॅटिन भाषेत भाषांतर केले. पुढे हेच लॅटिन भाषांतर अनेक युरोपियन अभ्यासकांनी आपापल्या भाषांमध्ये भाषांतरित केले. फ्रेंच तत्त्वज्ञ रोमा रोलाँ यांनी उपनिषदांचा अभ्यास केला होता. त्यांनी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे चरित्रग्रंथही लिहिले. पॉल डसन नावाच्या फ्रेंच तत्त्वज्ञाने ‘सिक्स्टी उपनिषदस ऑफ द वेदा’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. रशियामध्ये लिओ टॉलस्टॉय यांनी उपनिषदांचे लॅटिन भाषांतर वाचले होते.

२. फेड्रिक श्लेगल अर्थर शोपेनहार आणि प्रा. मॅक्सम्युलर यांनी केले उपनिषदांचे अध्ययन !

जर्मनीमध्ये फेड्रिक श्लेगल अर्थर शोपेनहार आणि प्रा. मॅक्सम्युलर या तत्त्वज्ञांनी उपनिषदांचे अध्ययन केले. मॅक्सम्युलरने ५१ खंडात प्रकाशित केलेल्या ‘सॅक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये असे म्हटले आहे, ‘माझे संस्कृत साहित्यावर विशेष प्रेम उपनिषदांच्या अभ्यासामुळेच निर्माण झाले.’ वर्ष १८९६ मध्ये ऑक्सफर्ड येथे स्वामी विवेकानंद आणि मॅक्सम्युलर यांची भेट झाली होती. मॅक्सम्युलरने उपनिषदांच्या अभ्यासाचे महत्त्व प्रतिपादन केले होते.

३. ब्रिटीश अभ्यासकांनी उपनिषदांचा अभ्यास करून ते इंग्रजीत भाषांतर करणे

विल्यम जोन्स या ब्रिटीश अभ्यासकाने ‘ईशावास्य’ उपनिषदाचे इंग्रजीत भाषांतर केले. जोन्स यांनी वर्ष १७८४ मध्ये ‘एशियाटिक सोसायटी’ची स्थापना करून उपनिषदांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष केंद्रित केले. सर चार्ल्स विल्किंस यांनी ‘श्रीमद्भगवद्गीते’चे इंग्रजी भाषांतर करून ती टॉलस्टॉय आणि कार्लाइल या अभ्यासकांना भेट दिली. त्यानंतर मोनेर विल्यम्स या ब्रिटीश अभ्यासकाने संस्कृत भाषेचा, तसेच भारतीय शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्डमध्ये ‘इंडिया इन्स्टिट्यूटची’ स्थापना वर्ष १८८४ मध्ये भारतियांकडूनच पैसे उभा करून केली.

इंग्रजी साहित्यात प्रसिद्ध असलेले विल्यम वर्डसवर्थ, शेले, एडविन अजॉल्ड, विल्यम ब्लेक टी. एस्. एलिएट अशा अनेक कवींनी उपनिषद ग्रंथ वाचले होते. एलियट या कवीच्या वर्ष १९२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द वेस्टलँड’ या कवितेचा शेवट उपनिषदांच्या ओळींनी झाला आहे.

४. अमेरिकेत वर्ष १८९३ पासून उपनिषदांच्या अभ्यासाला प्रारंभ

अमेरिकेत वर्ष १८४२ मध्ये ‘अमेरिकन ओरिएंटल सोसायटी’ची बॉस्टन येथे स्थापना झाली. ‘हार्वर्ड’ विद्यापिठाने वर्ष १८९१ पासून ‘हॉवर्ड ओरिएंन्टल सिरीज’ नावाची ग्रंथमालिका चालू केली. वर्ष १८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद सहभागी झाले आणि तेथूनच अमेरिकेत उपनिषदांच्या अभ्यासाला प्रारंभ झाला. राल्फ वाल्डो इमर्सन, हेन्री डेव्हिड थोरो आणि वॉल्ट व्हिटमन या ३ प्रसिद्ध अमेरिकन कवींनी उपनिषदांचा सांगोपांग अभ्यास केला. इमर्सनची ‘ब्रह्मा’ नावाची कविता प्रसिद्ध आहे.

५. पाश्चात्त्य अभ्यासकांनी उपनिषदे आणि संस्कृत भाषा यांचा अभ्यास भारतियांच्या धर्मांतरासाठी करणे !

पाश्चात्त्य अभ्यासकांनी उपनिषदे आणि संस्कृत भाषा यांचा अभ्यास भारतियांची मनोभूमिका समजून घेण्यासाठी, तसेच येथील हिंदूंचे ख्रिस्ती करण्यासाठी (धर्मांतरासाठी) केला. हे करत असतांना त्यांनी भारतीय भाषा, त्यांचे व्याकरण आणि लिपी यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून भारतीय विद्येकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. अनेकदा त्यांनी वेद आणि उपनिषदे यांचे चुकीचे अर्थ लावले असून त्यांचाही अभ्यास करायला हवा.’

– डॉ. प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी, ठाणे
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै ते सप्टेंबर २०२३)