कुलर वापरतांना विद्युत् सुरक्षेविषयी काळजी घ्या ! – महावितरणचे आवाहन
रत्नागिरी – सध्या तापमानाचा पारा चढला आहे. वाढत्या तापमानापासून बचावासाठी वातानुकूलन यंत्राचा वापर वाढतो. त्यात कुलरच्या वापरास पसंती दिली जाते. कुलरच्या थंड हवेचा गारवा अनुभवतांना विद्युत् सुरक्षेविषयी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे महावितरणचे आवाहन आहे.
कुलर वापरत असतांना ओल्या हाताने तो चालू वा बंद करणे, त्यास स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असावी. त्यामुळे लहान मुलांचा हात कुलरच्या पंख्यात जाणार नाही. कुलरसाठी श्री पिन प्लग आणि सर्किटचा वापर करावा. कुलरच्या वीजतारांचे (वायर्सचे ) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करावी. जुन्या, कालबाह्य आणि जोड वायर्सचा वापर करू नये. जुने कुलर वापरात घेतांना तपासणी आणि तांत्रिक बिघाड दुरुस्ती मान्यताप्राप्त व्यवसायिक तंत्रज्ञाकडून करून घ्यावी.
आपल्या घरातील, व्यवसायाच्या ठिकाणच्या विद्युत् संच मांडणीतील अर्थिंग सुस्थितीत असल्याची तपासणी परवानाधारक विद्युत् कंत्राटदाराकडून करून घ्यावी. जुन्या वायरिंगची तपासणी करून खराब झालेली, तसेच आवरणाची रोधक क्षमता न्यून झालेली वायरिंग तात्काळ बदलण्यात यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.