Taiwan Earthquake : तैवानमध्ये ७.५ तीव्रताचे भूकंप : ७ जणांचा मृत्यू
तैपेई (तैवान) – चीनच्या शेजारी असणार्या तैवान या बेट देशामध्ये ३ एप्रिलला पहाटे ७.५ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ७० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. या भूकंपाचे धक्के जपान, फिलिपाईन्स आणि चीन येथेही जाणवले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्व तैवानमधील हुआलियन शहरात हा भूकंप झाला. त्याचे केंद्र भूमीपासून ३४ किलोमीटर खाली होते. या भूकंपामुळे अनेक इमारतींची हानी झाली. काही इमारती कोसळल्या, तर काही झुकल्या. भूकंपानंतर प्रथम सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आली होती; मात्र नंतर ती मागे घेण्यात आली. तैवानमध्ये २५ वर्षांतील हा सर्वांत शक्तीशाली भूकंप आहे. यापूर्वी वर्ष १९९९ मध्ये ७.६ रिक्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा २ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
भूकंपामुळे ९१ सहस्रांहून अधिक घरांमधील वीज ठप्प झाली आहे. भूकंपामुळे वीज प्रकल्पांची हानी झाली आहे.
का होतात भूकंप ?
पृथ्वीचा पृष्ठभाग प्रामुख्याने ७ मोठ्या आणि अनेक लहान टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स सतत तरंगत रहातात आणि कधीकधी एकमेकांवर आदळतात. अनेक वेळा टक्कर झाल्यामुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा अधिक दाब येतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून बाहेर पडणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि या गडबडीनंतर भूकंप होतो.
प्रतिवर्षी जगात २० सहस्र भूकंप होतात !
राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र प्रतिवर्षी सुमारे २० सहस्र भूकंपांची नोंद करते. यांपैकी १०० भूकंप असे आहेत की, ज्यामुळे अधिक हानी होते. भूकंप काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकतो. इतिहासातील सर्वांत अधिक काळ टिकणारा भूकंप वर्ष २००४ मध्ये हिंद महासागरात झाला होता. हा भूकंप १० मिनिटे टिकला.