पाणी आणि चारा पुरवठ्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करा ! – नितेश पाटील, जिल्हाधिकारी, बेळगाव
बेळगाव – जिल्ह्यात पुढील २ मासांत पिण्याचे पाणी आणि गुरांच्या चार्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी अधिकार्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करावे. ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी सातत्याने बैठका घेण्यात याव्यात. काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी अधिकार्यांनी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे त्या शेजारील जलाशयात पाणी उपलब्ध असल्यास आवश्यकतेनुसार पाणी सोडावे. जलाशयातील पाण्याची पातळी अल्प असल्याने येणार्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी नदीकाठच्या सर्व वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे, तेथे पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करावी. अथणी, कागवाड येथील ज्या गावात पाणीटंचाई आहे तेथे पहाणी करून जलाशयांमधून पाणी सोडण्यात येईल.’’