सातारा-पुणे महामार्गावर १ एप्रिलपासून सुधारित पथकरवाढ लागू !

सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – सातारा-पुणे महामार्गावरील एस्. टोल रोड प्रा. लि. आणि महामार्ग प्राधिकरण यांनी पथकरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून सुधारित पथकरवाढ लागू करण्यात आली आहे. एस्. टोल रोड प्रा. लि. आणि महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार प्रतिवर्षी पथकाराचे दर वाढत असतात. या वर्षीही पथकर दरवाढ करण्यात आली आहे.

आनेवाडी पथकर नाक्यावर कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या मोटार वाहनांकडून एका बाजूच्या प्रवासासाठी ८० रुपये टोल आकारला जाणार आहे. हलके व्यावसायिक वाहन किंवा मिनी बससाठी १३५ रुपये, बस किंवा ट्रकसाठी २८० रुपये, जड बांधकाम मशिनरी किंवा मल्टी ॲक्सल वाहनांसाठी ४३५ रुपये, तर मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी ५३० रुपये पथकर आकारला जाणार आहे. पथकर नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिघात रहाणार्‍या स्थानिक नागरिकांना मासिक पाससाठी ३४० रुपये मोजावे लागणार आहेत. महामार्गामुळे दळणवळण अधिक गतिमान झाले; परंतु महामार्ग प्राधिकरणाकडून प्रवाशांना पायाभूत सेवा-सुविधांची पूर्तता केली जात नसल्याची ओरड प्रवाशांमधून नेहमीच केली जाते. पथकर वाढीचा सर्वसामान्य नागरिकांना काही अंशी फटका बसणार आहे. आनेवाडीसमवेतच खेड-शिवापूर पथकर नाक्यावरही १ एप्रिलपासून सुधारित पथकर दरवाढ लागू झाली आहे.