साधकांना ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, हे तत्त्व शिकवणारे आणि पंचतत्त्वे अन् निर्गुण तत्त्व यांची अनुभूती देऊन भावस्थितीचा परमानंद प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘एका पहाटे गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरातील स्वच्छतेची सेवा केली. त्यानंतर मी स्वयंसूचना सत्र करत असतांना गुरुदेवांनी मला भावजागृतीचा प्रयोग करण्याचा विचार दिला. त्यानुसार मी भावजागृतीचा प्रयोग करायला आरंभ केला. एरव्ही मी बुद्धीने विचार करून भावजागृतीचा प्रयोग करते; परंतु आज मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना केली, ‘तुम्हीच मला भावजागृतीचा प्रयोग सुचवा आणि त्याप्रमाणे माझ्याकडून करून घ्या.’ त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी माझ्याकडून भावजागृतीचा पुढील प्रयोग करून घेतला.
१. गुरुदेवांची आठवण येऊन त्यांना भेटण्याची ओढ लागणे आणि गुरुदेवांच्या कृपेने सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळणे
‘मी डोळे मिटले आहेत. मला गुरुमाऊलींची तीव्रतेने आठवण येत आहे. मला त्यांना भेटण्याची ओढ लागली आहे. मी त्यांना आर्ततेने प्रार्थना करत आहे, ‘हे गुरुदेवा, मला आपले दर्शन देऊन उपकृत करावे.’ त्यानंतर त्यांनी सूक्ष्मातून मला रामनाथी आश्रमात जाण्याचे सुचवले. मला सूक्ष्मातून रामनाथी आश्रम दिसत आहे. मी नामस्मरण करत रामनाथी आश्रमाकडे जात आहे.
२. रामनाथी आश्रमाच्या फाटकाजवळ गेल्यावर सुगंध येणे आणि ही पृथ्वीतत्त्वाची अनुभूती असल्याचे गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगणे
मी आश्रमाच्या फाटकाजवळ पोचले आहे. मला प्रवेश दिल्याबद्दल मी फाटकाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. मला सुगंध येत आहे. मला गुरुमाऊलींचा आवाज ऐकू येत आहे. ते मला सांगत आहेत, ‘ही सुगंधाची अनुभूती, म्हणजे पृथ्वीतत्त्वाची अनुभूती आहे, हो !’ तेव्हा मी आनंदाने पुलकित होत आहे. मी कृतज्ञता व्यक्त करून पुढे जात आहे.
३. यज्ञकुंडाजवळ गेल्यावर तोंडात गोड चव निर्माण होणे आणि ही आपतत्त्वाची अनुभूती असल्याचे गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगणे
त्यानंतर मी आश्रमातील यज्ञकुंडाजवळ पोचले आहे. ‘याच यज्ञकुंडातून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत असते आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या मार्गातील अडथळे दूर होत असतात’, याची जाणीव होऊन मी यज्ञकुंडाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. तेवढ्यात माझ्या तोंडात गोड चव निर्माण झाली. तेव्हा गुरुमाऊली सूक्ष्मातून मला सांगत आहेत, ‘ही आपतत्त्वाची अनुभूती आहे, बरं का !’ ‘मला ही अनुभूती देऊन त्याविषयी सांगितले’, त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणांवर डोके ठेवून कृतज्ञता व्यक्त करत आहे आणि पुढे जात आहे.
४. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर तेजस्वी पांढरा प्रकाश दिसणे आणि ‘ही तेजतत्त्वाची अनुभूती आहे’, असे गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगणे
मी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येत आहे. याच प्रवेशद्वारातून प्रतिष्ठित व्यक्ती, साधक, संत आणि सूक्ष्मातून देवता अन् ऋषिमुनी आश्रमात प्रवेश करतात. मी प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर डोके टेकवून शरणागतभावाने दंडवत घालत आहे. तेवढ्यात मला सर्वत्र पुष्कळ तेजस्वी पांढरा प्रकाश दिसत आहे. त्या प्रकाशाकडे पाहून माझे डोळे दिपले आहेत. त्या प्रकाशातून आत जातांना माझा सूक्ष्मदेहही प्रकाशमान होत आहे. माझ्या षड्चक्रांची शुद्धी होऊन मला चैतन्य मिळत आहे. तेव्हा गुरुमाऊली सूक्ष्मातून मला सांगत आहेत, ‘ही तेजतत्त्वाची अनुभूती आहे, हे तुमच्या लक्षात येत आहे ना !’ ‘गुरुदेवांनी अनुभूती देऊन त्याविषयी सांगितले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवून कृतज्ञता व्यक्त करत आहे आणि पुढे जात आहे.
५. आश्रमाच्या वरच्या माळ्यांवर जाण्यासाठी पायर्या चढत असतांना वार्याची मंद झुळूक शरिराला स्पर्श करून जाणे आणि ही वायुतत्त्वाची अनुभूती असल्याचे गुरुदेवांनी सूक्ष्मातून लक्षात आणून देणे
आश्रमातील वरच्या माळ्यांवर जाण्यासाठी पायर्या चढून जातांना ‘याच पायर्यांमुळे मला श्रीविष्णुस्वरूप गुुरुमाऊलींकडे जाता येणार आहे’, या विचाराने मला प्रत्येक पायरीच्या प्रती कृतज्ञता वाटत आहे. त्या वेळी माझी भावजागृती होत आहे. तेव्हा मला वाटत आहे, ‘पायर्या, म्हणजे साधकांना साधनामार्गात साहाय्य करणार्या गुरुसेविकाच आहेत. मी त्यांच्यावर पाय ठेवूनही त्यांच्यातील अहंशून्यतेमुळे त्यांना आनंदच होत आहे.’ ‘या भाग्यशाली पायर्यांनी संत, सद़्गुरु आणि गुरुमाऊली यांच्या पादुका डोक्यावर ठेवून वाहिलेल्या आहेत’, असे मला जाणवत आहे. मी अशा चैतन्यमयी पायर्या अलगद चढून वर जात आहे. अकस्मात् वार्याच्या मंद झुळुकीचा माझ्या शरिराला स्पर्श होत आहे. त्या वार्याच्या झुळुकीसह माझ्या मनातील सर्व विचार वाहून जात आहेत. आता माझ्या मनामध्ये कोणतेच विचार नाहीत. माझा ‘निर्विचार’ हा जप चालू झाला आहे. तेव्हा गुरुमाऊली सूक्ष्मातून मला सांगत आहेत, ‘ही वायुतत्त्वाची अनुभूती आहे.’ गुरुदेवांनी अनुभूती दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून पहिल्या माळ्यावर पोचले आहे.
६. श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींच्या कक्षात गेल्यावर प्रचंड पोकळी दिसणे, पोकळीतून सूक्ष्म दैवी नाद ऐकू येणे आणि ही आकाशतत्त्वाची अनुभूती असल्याचे गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगणे
आता मी श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींच्या कक्षाच्या बाहेर पोचले आहे. आतमध्ये जाण्यापूर्वी मी त्यांच्या कक्षाच्या उंबरठ्यावर मस्तक ठेवून ‘मला दर्शन द्यावे’, अशी प्रार्थना करत आहे. मी दार उघडून आत गेले आहे; पण मला गुरुमाऊली दिसत नाहीत. मला तेथे केवळ एक प्रचंड पोकळी दिसत आहे आणि मी मुंगीसारखी अगदी लहान दिसत आहे. या वेळी माझा ‘निर्विचार’ हा जप थांबला असून माझे लक्ष केवळ श्वासावर केंद्रित झाले आहे. त्या पोकळीतून मला सूक्ष्म दैवी नाद ऐकू येत आहे. तेव्हा गुरुमाऊली सूक्ष्मातून मला सांगत आहेत, ‘ही आकाशतत्त्वाची अनुभूती आहे’, हे तुमच्या लक्षात येत आहे ना ?’ ‘मला काहीच येत नसतांना आतापर्यंत गुरुदेवांनीच सर्व शिकवले आहे’, याची जाणीव होऊन मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करत आहे.
७. ‘गोळ्याच्या स्वरूपातील स्वतःचा देह गुरुमाऊलींच्या चरणांमध्ये विलीन होत आहे’, असे जाणवणे आणि ही निर्गुण तत्त्वाची अनुभूती असल्याचे त्यांनी सूक्ष्मातून लक्षात आणून देणे
त्यानंतर मी अनंत पोकळीमध्ये प्रवेश केला आहे. तेथे मी गुरुमाऊलींना ‘मला तुमच्या चरणांपर्यंत पोचवा’, अशी आर्ततेने प्रार्थना करत आहे. तेव्हा मला तेथे अथांग क्षीरसागर दिसत आहे. त्यावर श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊली शेषशायी रूपात पहुडलेले दिसत आहेत. त्यांना शेषशायी स्थितीत पाहून मला पुष्कळ आनंद होत आहे. मी त्यांच्या कोमल चरणांवर डोके ठेवत आहे. त्या वेळी त्यांच्या चरणांमधून प्रक्षेपित होणारे तेज माझ्या भ्रूमध्यातून शरिरात जात आहे आणि माझ्या षड्चक्रांची शुद्धी होत आहे. त्यानंतर मी त्यांना प्रदक्षिणा घालत आहे. जसजशी माझी प्रदक्षिणा पूर्ण होत आहे, तसतसा माझा संपूर्ण देह प्रकाशमान होऊन एका गोळ्यामध्ये रूपांतरीत होत आहे. त्यानंतर माझा गोळ्याच्या स्वरूपातील देह सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच्या चरणांमध्ये विलीन होत आहे. हे पाहून मला पुष्कळ आनंद होत आहे. तेव्हा गुरुमाऊली मला सूक्ष्मातून सांगत आहेत, ‘ही निर्गुण तत्त्वाची शेवटची अनुभूती आहे !’
८. ‘कृतज्ञता’ हा जप होणे
‘माया’ नाव असलेल्या माझ्यासारख्या मायेतील क्षुद्र जिवाला सच्चिदानंद परब्रह्माने त्यांच्या चरणी सामावून घेतले आहे. ‘गुरुमाऊलींच्या चरणांवर भावाश्रूंचा अभिषेक करून आजन्म कृतज्ञताभावात रहाणे, एवढेच माझ्या हातात आहे’, याची जाणीव होऊन माझ्याकडून केवळ ‘कृतज्ञता’ हाच जप होत आहे.’
९. कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपण मला पंचतत्त्वे आणि निर्गुण तत्त्व यांची अनुभूती देऊन भावस्थितीत घेऊन गेलात. मी स्वतःच्या प्रयत्नांनी या स्थितीत कधीच जाऊ शकत नाही. ‘आपण मला भावस्थितीत ठेवून माझ्याकडून साधना आणि सेवा करून घ्या’, अशी शरणागतभावाने प्रार्थना करून आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |