मांसाहार म्हणजे अभक्ष भक्षण (जे भक्षण्यास योग्य नाही ते) !
‘अलीकडे कित्येक भारतीय आवडीने मांसाहार करतांना आढळून येतात. फॅशन म्हणून, श्रीमंतीचा थाट म्हणून तर कधी आणखी कोणत्या कारणासाठी. पुष्कळ भारतियांना आपल्याला मांसाहार आवडतो कि नाही ? हेही कळत नसते, तर काही भारतियांना आम्ही हा प्रकार खात नाही, हे सांगणे कमीपणाचे वाटते. अशा वेळी ते ठरवतात की, इतके प्रकार दिसतात, तर खाऊन पहावेत. इतके जण खातात; मग आपणच काय वेगळे आहोत इतरांपेक्षा ? तर कित्येक जण मांसाहार कसा सोयीचा आहे, हे स्वतःला आणि अन्यांना पटवून सांगतात अन् जेवणाच्या सवयी पालटतात. एकदा ती सोय म्हटल्यावर सगळे संपलेच. मग परदेशी लोकांसारखे डुकराच्या मांसापासून मगरीच्या मांसापर्यंत सगळे पशूपक्षी खाण्यास मनुष्य मोकळा होतो. वास्तविक त्याची ही सदसद्विवेकबुद्धी, त्याच्यावर झालेले संस्कार अंतर्मनातून आवाज देऊन विचारत असतात, ‘बाबा रे ! तू हे जे खातोस ते खाणे योग्य आहे का ?’; पण तो आवाज ऐकायचा कुणी ?
अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर एक सरळ सरळ विचार आपल्याला मिळतो आणि तो विचार सांगतो, ‘मांसाहार म्हणजे अभक्ष भक्षण (जे भक्षण्यास योग्य नाही ते).’ ते अयोग्य का आहे ? तर त्याचे साधे उत्तर, म्हणजे आपण ज्या प्राण्याचे मांस खाऊ त्या प्राण्याचे स्वभाव-गुणधर्म आपल्यात उतरतात. थोडक्यात आपल्या वृत्तीत फरक पडतो. तमोगुणी अथवा रजोगुणी प्रवृत्ती जोपासली जाते. प्राण्यांना बुद्धी आणि विवेक नसतो. त्यामुळे मत्सर, संघर्ष, हिरावून घेणे, हे त्यांचे निसर्गदत्त गुण पर्यायाने मनुष्य स्वभावातही उतरत असतात.’
– अपर्णा घाटे
(साभार : मासिक, ‘प्रसाद’, फेब्रुवारी २०१२)