सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक घेत असलेल्या साधनेच्या आढाव्यातून फोंडा (गोवा) येथील सौ. दीपा मामलेदार यांना शिकायला मिळालेली सूत्रे
‘गुरुदेवांच्या कृपेने मला मागील १० मासांपासून कु. अनुराधा जाधव यांच्या समवेत एका सेवेचे दायित्व मिळाले. तेव्हापासून मला त्यांच्या समवेत सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या साधनेच्या आढाव्याला जोडण्याची संधी मिळाली.
१. आरंभी आढावा देण्याची भीती वाटणे
आढावा चालू झाल्यावर आरंभी माझ्या मनात ‘उपस्थित सर्व साधक आधीपासून दायित्व घेऊन सेवा करतात. मला त्यांच्या समवेत आढावा द्यायला जमेल का ?’, असे विचार येऊन भीती वाटायची. रात्री झोपेतून जाग आल्यावरही माझ्या मनात आढाव्याचेच विचार असायचे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जाऊन काही दिवस सतत प्रार्थना केल्यावर हळूहळू मनातील भीती, म्हणजे प्रतिमेचे विचार न्यून होणे
एक दिवस मी गुरुदेवांना पुष्कळ शरण जाऊन प्रार्थना केली. ‘हे गुरुदेवा, तुम्हीच मला हे दायित्त्व दिले आहे. तुम्हीच मला घडवणार आहात. तुम्हीच माझ्या मनात प्रतिमेमुळे येणारे विचार नष्ट करून मला शिकण्याच्या स्थितीत ठेवा.’ देवच माझ्याकडून दिवसातून ३ – ४ वेळा अशा प्रार्थना मनापासून करून घेत होता. त्यामुळे हळूहळू माझ्या मनातील भीती, म्हणजे प्रतिमेचे विचार न्यून झाले आणि मी माझ्याकडून झालेले प्रयत्न आढाव्यात सांगू लागले.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी सांगितलेले मनापासून स्वीकारल्याने प्रयत्नांत वाढ होणे
आरंभी मला मनाचा अभ्यास करण्यास जमत नसे. तेव्हा सौ. मनीषाताई (आताच्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक) आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती डॉ. शिल्पा कोठावळे मला साहाय्य करत असत. आधी त्यांनी मला ‘आढाव्याविषयी मनाची असलेली स्थिती सहसाधिका अनुराधा जाधव यांना सांगा’, असे सांगितले. अनुराधा जाधव यांनी मला पुष्कळ आधार दिला. आढाव्याच्या शेवटी सद्गुरु स्वातीताई ‘आम्ही कुठे उणे पडतो ?’, ‘कसे प्रयत्न करायला हवे आहेत ?’, याविषयी सांगतात. त्यातून मला पुष्कळ प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. मला इतरांच्या माध्यमातूनही शिकता येत आहे. ‘सद्गुरु स्वातीताई प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्रयत्न सांगून आम्हाला घडवत आहेत’, असा भाव माझ्यामध्ये निर्माण झाला. त्यामुळे सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेले प्रयत्न मनापासून स्वीकारता येऊ लागले. गुरुकृपेनेच माझ्या प्रयत्नांत वाढ झाली.
४. पालट
४ अ. साधकांचा अभ्यास न करणे; उलट साधकांकडून पुष्कळ अपेक्षा असणे : आधी माझ्याकडून साधकांची स्थिती आणि त्यांच्या अडचणी यांचा अभ्यास होत नसे. त्यामुळे माझ्या त्यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या. माझ्याकडून त्यांच्यातील गुण पाहिले जात नसत.
४ आ. सद्गुरु स्वातीताई आणि पू. (सौ.) मनीषा पाठक सांगत असलेल्या सूत्रांमुळे साधकांविषयी आपलेपणा वाटून त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे : आढाव्यात प्रतिदिन सद्गुरु स्वातीताई आणि पू. मनीषाताई ‘साधकांचा अभ्यास कसा करायचा ?’, ‘साधकांना साधनेत पुढे कसे न्यायचे ?’, ते सांगतात. सद्गुरु स्वातीताई प्रतिदिन या सूत्रांची आम्हाला आढाव्यात जाणीव करून देतात. त्यामुळे आता माझ्याकडून साधकांचा अभ्यास होतो. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले जाते. त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडवायचा प्रयत्न होतो. त्यामुळे आता प्रत्येक साधकाची क्षमता पहाता ‘त्यांच्याकडून जी सेवा होते’, त्याविषयी मला कृतज्ञता वाटू लागली. त्यांचे गुणही माझ्या लक्षात येऊ लागले. माझ्या मनात त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा हळूहळू न्यून होऊन त्यांच्याविषयी मला आपलेपणा वाटू लागला.
४ इ. साधकांविषयी आपलेपणा वाटू लागल्याने साधकांना प्रोत्साहन देऊन साहाय्य केले जाणे : माझा साधकांविषयी विचार होऊ लागल्यामुळे मला साधकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देता येऊ लागले. ‘गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात साधकांना सहभागी होता यावे’, यासाठी मी वेळोवेळी साधकांना निरोप देणे, बैठकीला जोडणे, त्यांना हवी असलेली माहिती देणे, त्यांना आवश्यक ते साहाय्य करणे इत्यादी सेवा केल्या. त्यामुळे अल्प दिवसांत ब्रह्मोत्सवात सर्व साधकांना गुरुदेवांचे प्रत्यक्ष भावपूर्ण दर्शन घेता आले आणि तो अद्भूतपूर्व सोहळा अनुभवता आला.
४ ई. सद्गुरु आणि संत घेत असलेल्या व्यष्टी आढाव्याचा झालेला लाभ ! : सद्गुरु स्वातीताईंनी ‘साधकांच्या चुका वेळोवेळी कशा सांगायच्या ?’, ‘त्यांना साधनेत पुढे कसे न्यायचे ?’, याविषयी आढाव्यातून दिशा दिली. पू. मनीषाताईंनी आढाव्यातच प्रसंगांतून शिकवले. त्यामुळे माझ्याकडून साधकांना त्यांच्याकडून होणार्या चुका सांगायला आरंभ झाला. साधकही त्याला चांगला प्रतिसाद देऊ लागले. अशा प्रकारे सद्गुरु आणि संत घेत असलेल्या आढाव्याचा मला प्रत्यक्ष लाभ होत आहे. अजून पुष्कळ शिकण्यासारखे आहे; पण माझेच प्रयत्न पुष्कळ अल्प पडतात.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
गुरुदेवांच्या कृपेने मला सेवेचे दायित्व मिळाले. ‘सद्गुरु आणि संत घेत असलेल्या आढाव्यांतून मला शिकता आले अन् कृती करून ते अनुभवता आले’, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
‘हे गुरुदेवा, संतांकडून शिकण्यास मी पुष्कळ अल्प पडत आहे. तुम्हीच मला शिकण्याची बुद्धी आणि प्रेरणा द्यावी’, अशी आपल्या चरणी शरणागतीने प्रार्थना आहे.’
– सौ. दीपा मामलेदार, फोंडा, गोवा. (७.९.२०२३)
तीव्र शारीरिक त्रासातही साधकांना घडवण्यासाठी सतत धडपडणार्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक !१. ‘पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे शारीरिक त्रास ऐकून स्वतःला होणारे शारीरिक त्रास किती अल्प आहेत’, हे लक्षात येणे सद्गुरु स्वातीताई पू. मनीषाताईंच्या शारीरिक त्रासांविषयी आम्हाला सांगत असत; पण जेव्हा मी त्यांना रामनाथी आश्रमात प्रत्यक्ष पाहिले, तेव्हा ‘माझे शारीरिक त्रास पुष्कळच अल्प आहेत’, याची मला मनापासून जाणीव झाली. ‘पू. मनीषाताई कितीही शारीरिक कष्ट होत असले, तरी त्या स्वत: सकाळच्या व्यष्टी आढाव्याला जोडतात. त्या प्रत्येकाचा आढावा मनापासून ऐकून त्यांना भावपूर्ण साहाय्यही करतात. २. ‘साधकांची साधना होऊन त्यांची साधनेत प्रगती व्हावी’, यासाठी सातत्याने प्रयत्नरत असलेल्या पू. (सौ.) मनीषा पाठक शीघ्र गतीने संत होणे शारीरिक कष्टांच्या स्थितीतही पू. मनीषाताई यांची आढाव्याविषयीची तळमळ, ‘साधकांची साधनेत प्रगती व्हावी’, यासाठी असणारी धडपड पुष्कळच आहे. त्यामुळे ‘सत्संग, शिबिरे इत्यादी गुरुदेवांना अपेक्षित अशी व्हावीत अन् भावपूर्ण सेवेतून सर्व साधकांना आनंद मिळावा’, या ध्येयाने प्रेरित असलेल्या सौ. मनीषाताई शीघ्र गतीने पू. (सौ.) मनीषाताई झाल्या.’ – सौ. दीपा मामलेदार, फोंडा, दक्षिण गोवा. (७.९.२०२३) |