समाजात उल्लेखनीय कार्य करणार्यांना दिला पुरस्कार
रत्नागिरीत अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी – अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी थाटात करण्यात आले. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. केवळ ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित न रहाता समाजात उल्लेखनीय कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या वेळी (कै.) सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार उद्योजिका वनिता उपाख्य गीता परांजपे, गुहागर येथील उद्योजिका वसुधा जोग, दापोलीतील कर्णबधिर विद्यालयाच्या संचालिका सौ. रेखा बागुल यांना प्रदान केला. ‘साडी, श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ’, असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्कृतप्रेमी पुरस्कार सौ. राजश्री लोटणकर यांना, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर शौर्य पुरस्कार त्रिविक्रम शेंड्ये आणि आर्यन भाटकर या युवकाला देण्यात आला. समशेरबहाद्दर पुरस्कार गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा (तासगाव) येथील शिवम कर्चे याला सन्मानपूर्वक प्रदान केला. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दैवज्ञ पतसंस्थेचे संस्थापक सदस्य, दैवज्ञ भवनचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांना देऊन सन्मानित केले. तसेच युवा गौरव पुरस्कार अथर्व शेंड्ये याला आणि सेवा गौरव पुरस्कार नाचणे गावचे सदस्य सुनील सुपल यांना प्रदान करण्यात आला.
मंडळाच्या वतीने यावर्षी विशेष सत्कार देण्यात आले. यात वडिलोपार्जित व्यवसाय पुढे आधुनिक करणारे आशिष लिमये, अदिवक्ता तेजराज जोग, नचिकेत पटवर्धन यांना सन्मानित करण्यात आले. विविध परीक्षांमधील यशाबद्दल विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. सागरी सीमा मंच या संस्थेला ५ सहस्र रुपयांचे साहाय्य देण्यात आले. मंडळाच्या (कै.) ल. वि. केळकर वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी सुजित फडके आणि (कै.) आनंदीबाई त्रिविक्रम केळकर वसतीगृहातील मधुरा घुगरे हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (कै.) सत्यभामाबाई फडके निधीतून मेघना गोगटे यांना आर्थिक साह्य दिले. तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाच्या सभासदांचा सत्कार केला.
या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष विश्वास बापट, उपाध्यक्षा स्मिता परांजपे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.