नाव पालटल्याने दुसर्याचे घर स्वतःचे होत नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर
अरुणाचल प्रदेशातील गावांची नावे पालटल्याच्या घटनेवर परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी चीनला सुनावले !
सूरत (गुजरात) – आज मी एखाद्या घराचे नाव पालटले, तर ते माझे होईल का ? अरुणाचल प्रदेश भारताचे राज्य होते, आहे आणि राहील. नाव पालटल्याने काही फरक पडणार नाही, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला फटकारले. चीनने अरुणाचल प्रदेशातील ३० ठिकाणांची नावे पालटून तो स्वतःचा भाग असल्याचा दावा केला होता. यामध्ये ११ रहिवासी क्षेत्रे, १२ पर्वत, ४ नद्या, १ तलाव आणि डोंगरातून जाणारा १ मार्ग यांचा समावेश आहे. याविषयी सूरत शहरातील एका कार्यक्रमात डॉ. जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. गेल्या ७ वर्षात चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे पालटण्याची ही चौथी वेळ आहे.
सौजन्य DNAIndiaNews
लडाखमध्ये अतिक्रमण केल्याच्या चीनच्या दाव्यावरही परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. याला प्रत्युत्तर देतांना ते म्हणाले की, आपले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आहे. त्यांना कधी काय करायचे ?, ते ठाऊक आहे.
संपादकीय भूमिकाचीनला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला समजेल अशा भाषेतच आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे ! |