चंपकधाम स्वामी देवस्थानच्या जत्रेत अन्य धर्मियांना व्यापार करण्यास अनुमती देऊ नये !
कर्नाटक देवस्थान – मठ आणि धार्मिक संस्था महासंघाकडून देवस्थान कार्यकारी अधिकारी यांना निवेदन !
बेंगळुरू (कर्नाटक) – देवस्थानांचे पावित्र्य राखण्यासाठी बंनेरुघट्ट रस्त्यावरील श्री चंपकधाम स्वामी देवस्थानच्या जत्रेच्या वेळी हिंदू सोडून अन्य धर्मियांना दुकाने लावण्यासाठी अनुमती देऊ नये, असे निवेदन कर्नाटक देवस्थान – मठ आणि धार्मिक संस्था महासंघाच्या वतीने देवस्थानच्या कार्यकारी मंडळाचे निरीक्षक श्री. शिवकुमार यांना देण्यात आले. या वेळी श्री. प्रकाश राव, श्री. त्यागराज, श्री. बंगारप्पा, श्री. श्रीनिवास, श्री. सुब्रमण्य एस्. भट, श्री. मनोज कुमार आणि अन्य भक्त उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, हिंदु देवस्थाने ही हिंदु धर्माची अत्यंत पवित्र अशी श्रद्धा केंद्रे आहेत आणि देवस्थानांचे स्वतःचे असे विशेष आध्यात्मिक, धार्मिक अन् ऐतिहासिक महत्त्व आहे. एप्रिल मासात या देवस्थानचा जत्रा महोत्सव होणार आहे. त्या वेळी देवावर श्रद्धा नसणार्या अन्य समुदायाचे आणि नास्तिक लोक हे देवस्थानाच्या प्रांगणात, परिसरात मंदिराच्या पावित्र्याला धक्का पोचेल, अशा रितीने व्यापार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी आणि जोपासण्यासाठी देवस्थानच्या परिसरात कोणत्याही कारणाने हिंदु सोडून अन्य धर्मियांना दुकाने लावण्याची अनुमती देऊ नये.