‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पेरलेले साधनेचे बीज कधीही वाया न जाता, ते फुलतेच’, हे रामनाथी आश्रमातील श्री. अविनाश जाधव यांना त्यांची छोटी बहीण सौ. अपर्णा भंडारे यांच्याकडून शिकायला मिळणे
१. घरातील आर्थिक जबाबदारी सांभाळत कु. अपर्णाने केलेला साधनेचा प्रारंभ !
‘परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कोरेगांव (जिल्हा सातारा) येथे झालेल्या सभेनंतर मी साधनेला आरंभ केला. माझ्यानंतर माझी छोटी बहीण कु. अपर्णानेही साधनेला प्रारंभ केला. आमच्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती. मी पूर्णकालीन साधना करू लागल्यानंतर घरातील आर्थिक जबाबदारी सांभाळत कु. अपर्णा साधना करत असे. कोरेगाव केंद्राच्या वतीने विविध ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावणे, सत्संगांचे नियोजन करणे, प्रसारासाठी जाणे, ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चे वितरण करणे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणे, असा तिचा सहभाग वाढत गेला.
२. परात्पर गुरुदेवांचा सत्संग मिळणे आणि पूर्णकालीन सेवा करण्याची इच्छा कु. अपर्णाने व्यक्त करणे
मिरज येथे दैनिक ‘सनातन प्रभात’ची पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती चालू होण्यापूर्वी वर्ष २००० मध्ये मी पूर्णकालीन सेवा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मी केवळ अपर्णालाच सांगितला होता. आई-वडिलांना त्याची कल्पना नव्हती. मी आश्रमात असतांना अपर्णा मिरज आश्रमात सहा ते आठ मास सेवेसाठी आली होती. त्या काळात तिला परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्याचप्रमाणे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि डॉ. (सुश्री) माया पाटील यांचाही सत्संग लाभला. मिरज आश्रमात असतांना कु. अपर्णाने स्वत: पूर्णवेळ होण्यासंदर्भात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांना विचारले होते. त्या वेळी ‘आम्ही दोघेही पूर्णकालीन साधना करू लागलो असतो, तर घरातून विरोध झाला असता’, हे लक्षात घेऊन ‘सध्या नको’, असे ठरले.
३. स्वत: चाकरी करत असतांना भावाला कधीही घराचे दायित्व सांभाळण्याविषयी विचारणा न करणे
मी पूर्णकालीन सेवेला प्रारंभ केल्यानंतर अपर्णा एका औषधांच्या आस्थापनात चाकरी करत होती, तसेच शिवणकामाचा वर्गही घेत होती. अशा प्रकारे माझ्यावर घराचे असणारे सर्व दायित्व तिने स्वत:वर घेतले; पण मला ‘तू साधना सोडून घराचे दायित्व संभाळण्यासाठी चाकरी कर’, असे तिने कधीच म्हटले नाही.
४. साधनेला पोषक वातावरण नसतांना गुरुदेवांच्या कृपेमुळे साधनारत रहाणे
परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे अपर्णाचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला. ज्या ठिकाणी ती सासरी गेली होती, त्या ठिकाणी साधनेचे किंवा कोणत्याही स्वरूपाचे आध्यात्मिक वातावरण नव्हते, तरीही त्या घरात गुरुदेवांच्या कृपेमुळे तिने स्वत:ची साधना, नामजप आणि प्रार्थना करणे इत्यादी चालू ठेवले. विवाहानंतर सौ. अपर्णाला मुंबईला जावे लागले. प्रारंभी दीड वर्ष परळ (मुंबई) येथे तिचे वास्तव्य होते. तोपर्यंत कोणत्याही साधकाचा तिच्याशी संपर्क नव्हता. केवळ परात्पर गुरुदेवांची कृपाच तिच्यासमवेत होती. त्यानंतर सौ. अपर्णा नवी मुंबईतील खारघर येथे रहाण्यासाठी आली. त्यानंतर सौ. अपर्णाच्या साधनेला खर्या अर्थाने प्रारंभ झाला. प्रारंभी साप्ताहिकाचे वर्गणीदार करणे आणि सनातनची सात्त्विक उत्पादनांची विक्री करणे अन् नामजप करणे, धर्मजागृती सभा आणि गुरुपौर्णिमा यांना जाणे, असे तिचे चालू झाले. ती वर्षातून तीन-चार वेळा अर्पण द्यायची किंवा विज्ञापने द्यायची. विवाहानंतर पहिली दोन वर्षे जरी साधनेपासून सौ. अपर्णा दूर गेली असली, तरी गुरुदेवांच्या कृपेमुळे ती पुन्हा साधनारत होऊन स्वत:सह पती आणि कुटुंबीय यांना घेऊन येत होती.
५. सेवेत नसतांनाही परात्पर गुरुदेवांनी सौ. अपर्णाचा हात कधीही न सोडल्याने तिने पुन्हा साधनापथावर मार्गक्रमण करणे
सौ. अपर्णाला शारीरिक सेवा करणे त्या काळात शक्य झाले नाही, तरीही परात्पर गुरुदेवांनी तिचा हात कधी सोडला नाही. ती नामस्मरण करत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात रहात असे. गेल्या दोन वर्षांपासून तिचा सहभाग अधिकाधिक वाढू लागला. प्रारंभी जिज्ञासू वाटणारी सौ. अपर्णा क्रियाशील साधकांच्या समवेत सेवा करू लागली. तिने स्वत:समवेत आमचे नातेवाईक आणि कुटुंबीय यांना साधनापथावर आणले. ती विविध धर्मसत्संगांच्या माध्यमातून किंवा अर्पणाच्या माध्यमातून सर्वांना जोडून घेऊ लागली. माझ्या मनात सतत रुखरुख असायची, ‘आपले कुटुंबीय साधनेत नाहीत’; पण सौ. अपर्णा क्रियाशील झाली आणि गुरुदेवांच्या कृपेमुळे स्वत:सह तिने सर्व कुटुंबियांना साधनेत आणले. तिच्यामुळे माझी मावशी, माझ्या आत्याची मुले, माझे चुलत पुतणे, चुलत बहिणीची मुले, तसेच मित्रमंडळी साधनेकडे वळली. धर्माविषयी त्यांच्या मनात असणारे स्फुल्लींग फुलवण्याची सेवा परात्पर गुरुदेवांनी सौ. अपर्णाच्या माध्यमातून करून घेतली.
६. परात्पर गुरुदेवांनी पेरलेले साधनेचे बीज फलद्रूप झाल्यानेच सौ. अपर्णा पुन्हा साधनारत होणे
परात्पर गुरुदेवांनी वर्ष १९९९ मध्ये अपर्णाच्या मनात जे साधनेचे बीज रोवले होते, ते सुप्तावस्थेत गेल्यावरही त्यास चैतन्यरूपी पाण्याचे सिंचन गुरुदेवांनी कायम चालू ठेवले होते. श्रीमन्नारायणस्वरूपी गुरुदेवांनी लावलेले कोणतेही बीज वाया जात नाही. ते कधी ना कधी फुलाफळांनी बहरतेच. आज मला सौ. अपर्णा कुटुंब सांभाळून करत असलेल्या सेवेची तळमळ पाहून लाज वाटते आणि ‘मी साधनेत किती अल्प पडत आहे’, याची माझ्या मनाला जाणीव होते. ती निर्मळ मनाने झोकून देऊन कोणतीही अपेक्षा न ठेवता धर्मकार्यात सहभागी होते. कोणत्याही कठीण प्रसंगात तिची परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धा ढळत नाही. त्यामुळे तिच्या दोन्ही मुलांवर साधनेचे संस्कार होऊ लागले आणि सासरी अध्यात्माची आवड निर्माण होऊ लागली. सौ. अपर्णाला पती श्री. सनेश सर्वतोपरी सहकार्य करतात. ते स्वत:ही नामजप करतात. प्रत्येक व्यवहार ‘एक कर्म’ या अर्थाने निर्मळतेने करतात. ‘श्रीमन्नारायणस्वरूपी गुरुदेवांनी लावलेल्या या बिजामुळे एक मुलगी माहेर आणि सासर अशी दोन्ही घरे प्रकाशमान करते’, हेच यातून मला शिकायला मिळाले.
प्रार्थना
श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव माझ्या सर्व कुटुंबियांचे जीवन साधनारूपी प्रकाशाने उजळवत आहेत, याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे नारायणस्वरूप गुरुदेवा, आम्हा सर्वांना तुमच्या चरणांची धूळ बनून रहाण्याची सदैव संधी मिळावी’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’
।। श्रीमन्नारायणमस्तु ।।
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.