ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा साजरा !
ज्येष्ठ पत्रकार एस्. रामकृष्णन यांना ‘जीवनगौरव’, तर ११ ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार यांचाही गौरव !
ठाणे, १ एप्रिल (वार्ता.) – पीटीआय आणि यू.एन्.आय. या राष्ट्रीय वृत्तसंस्थांसाठी वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार एस्. रामकृष्णन् यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. येथील ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात ३० मार्चला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी जिल्ह्यातील ११ ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार यांचाही गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा साजरा झाला.
ठाणे जिल्ह्यातील जडणघडणीत त्यांच्या लेखणीने योगदान देणारे कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार नाना पिसाट, सुधीर पोतदार, राजाराम माने, विश्वरथ नायर, प्रकाश परांजपे, कुसुमताई देशमुख, पांडुरंग रानडे, अनिल खेडेकर, ज्येष्ठ प्रेस छायाचित्रकार दीपक जोशी आणि वृत्तवाहिनीसाठी छायाचित्रीकरण करणारे अशोक गुप्ता यांचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
११ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे मुक्त पत्रकार प्रशांत सिनकर, राज्य पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड झालेले ज्येष्ठ संपादक कैलाश म्हापदी, राज्य अधिस्वीकृतीवर निवड झालेले ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे, विनोद जगदाळे, जयेश सामंत, संजय पितळे, तसेच मुंबई विभाग समितीवरील विभव बिरवटकर आणि कोकण समितीवरील मनोज जालनावाला, तसेच आरोग्य समितीवर निवड झालेले पत्रकार कविराज चव्हाण यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन दीपक दळवी यांनी, तर आभार प्रदर्शन नारायण शेट्टी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी मराठी पत्रकार परिषेदेचे विश्वस्त किरण नाईक, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय वैद्य, माजी सचिव योगेश त्रिवेदी, माजी माहिती अधिकारी निरंजन राऊत, उपाध्यक्ष तुषार राजे, सरचिटणीस नारायण शेट्टी, सचिव श्रीकांत खाडे उपस्थित होते.