बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’ कार्यालयातील नोटिसा ३ घंट्यांतच फाडल्या !
‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’ने ठेवीदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण
बीड – येथील ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक, पदाधिकारी यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीची तक्रार ठेवीदारांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी सखोल चौकशीसाठी उपस्थित रहावे म्हणून जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड शहरात येऊन ‘ज्ञानराधा’च्या मुख्य कार्यालयावर ७ नोटिसा अडकवल्या होत्या. हे पथक जालना येथे जाताच अडकवलेल्या नोटिसा चक्क फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे २६ मार्च या दिवशी ‘ज्ञानराधा’चा एकही संचालक अथवा पदाधिकारी चौकशीसाठी जालना येथे उपस्थित राहिला नसल्याने पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.
जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ मार्च या दिवशी बीड शहरात येऊन दुपारी ३ ते ५.३० या कालावधीत ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या बीड येथील जालना रस्त्यावरील मुख्य कार्यालयात अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ, अर्चना कुटे, आशीष पाटोदेकर, महाव्यवस्थापक नारायण शिंदे, सुभाष रोड शाखेचे व्यवस्थापक सचिन वाघमारे यांच्या नावे ७ नोटिसा लावल्या होत्या. अध्यक्ष सुरेश कुटे यांचे बीडच्या नवीन मोंढ्यातील घर आणि उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांच्या शिंदेनगर येथील घरावरही नोटिसा लावल्या होत्या. हे पथक जालना येथे जाताच मुख्य शाखेतील नोटिसा ३ घंट्यांत फाडल्या.