दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात १८ टक्क्यांनी वाढ !; आयुक्तांअभावी पनवेल महापालिकेचा कारभार विस्कळीत !…
वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात १८ टक्क्यांनी वाढ !
मुंबई – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढ केली आहे. एकेरी प्रवासासाठी चारचाकी हलक्या वाहनांना ८५ रुपयांऐवजी १०० रुपये, तर मिनी बस, टेम्पो यांना १३० रुपयांऐवजी १६० रुपये मोजावे लागतील. ट्रक आणि बस यांच्यासाठी १७५ रुपयांऐवजी २१० रुपये पथकर असेल. परतीच्या प्रवासासाठी हलक्या वाहनांना ४२.५ रुपयांऐवजी ५० रुपये, मिनी बस, टेम्पोसाठी ६५ रुपयांवरून ८० रुपये, तर बससाठी ८७.५० रुपयांऐवजी १०० रुपये मोजावे लागतील.
आयुक्तांअभावी पनवेल महापालिकेचा कारभार विस्कळीत !
पनवेल – आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे १३ दिवसांपूर्वी नगरविकास विभागाने राज्यातील अनेक महापालिका आयुक्तांचे स्थानांतर केले. पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचा कारभार विस्कळीत झाला आहे. पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा निर्णय झालेला नाही. अधिकारी-कर्मचारी वेळेत कामावर येत नाहीत.
अल्पवयीन मुलीवर ९ मासांपासून बलात्कार करणार्याला अटक !
नागपूर – एका तरुणाने वस्तीत रहाणार्या १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमीष दाखवून तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. गेल्या ९ मासांपासून हा प्रकार चालू होता. याविषयी कळल्यावर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून कृष्णा मच्छिरके (वय २६ वर्षे) याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना कठोर शिक्षाच करायला हवी ! |
स्वसंरक्षणार्थ केलेला प्रहार गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई – स्वसंरक्षणार्थ केलेला प्रहार गुन्हा ठरत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे ३ वर्षे कारागृहात असलेल्या एका महिलेची जामिनावर सुटका करण्यात आली. डोक्यात दगड घालून केलेल्या एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी ३१ वर्षीय महिलेला कारागृहात डांबण्यात आले होते. त्या व्यक्तीने महिलेला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. स्वसंरक्षणार्थ तिने आक्रमण केले.
अंधेरी येथे जैन मंदिरात चोरी करणार्याला अटक !
मुंबई – अंधेरी येथील जैन मंदिरात चोरी झाली. चोराने मंदिरातील चांदीचे सामान चोरले. पोलिसांनी १२ घंट्यांत आरोपीला अटक केली.
संपादकीय भूमिकावारंवार होणार्या मंदिरचोरीच्या घटना राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच दर्शवतात ! |