राज्यात ३४२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मद्य आणि अमली पदार्थ कह्यात !
लोकसभा निवडणूक २०२४
विनापरवाना ५५७ शस्त्रेही जप्त !
मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या विशेष पथकाद्वारे अवैध धंद्यांवर कारवाया चालू आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ ते २८ मार्च या कालावधीत करण्यात आलेल्या विशेष कारवाईमध्ये राज्यात अवैध मद्य, अमली पदार्थ, रोख रक्कम, तस्करीचा माल आदी जप्त करण्यात आले आहे. याची किंमत ३४२ कोटी २९ लाख रुपये इतकी झाली आहे. यासह अनुमती नसलेली तब्बल ५५७ शस्त्रास्त्रे पकडण्यात आली. केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही विशेष कारवाई केली. निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात करण्यात आलेल्या या कारवाईत ३३ कोटी १२ लाख रुपये इतकी अनामत रोकड, २३ लाख ४३ सहस्र ३६० लिटर अवैध मद्य, ६ लाख ६८ सहस्र ७७२ ग्रॅम अमली पदार्थ, ४० कोटी २३ लाख रुपये किमतीचे मौल्यवान दागिने पोलिसांनी कह्यात घेतले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्रात विशेष निरीक्षक म्हणून भारतीय सेवेतील निवृत्त अधिकारी धर्मेंद्र गंगवार आणि विशेष पोलीस निरीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी एन्. के. मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी परवाना असलेली २७ सहस्र ७४५ शस्त्रे पोलिसांनी जमा करून घेतली आहेत, तर १९० शस्त्रे जप्त केली आहेत.
संपादकीय भूमिका
|