वझरे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ग्रामस्थांनी गावातील अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले !
सातत्याने तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप !
दोडामार्ग : तालुक्यातील गावठाणवाडी, वझरे येथे एका महिलेच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी मद्याचा अवैध साठा कह्यात घेतला; मात्र पोलीस आणि संबंधित मद्यविक्रेते यांनी ग्रामस्थांच्या, ‘गावात मद्यविक्री करू नये’, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पोलिसांना यावर कारवाई करण्यास भाग पाडले.
गावात मद्यविक्रीमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असल्याने आगामी काळातील धोका ओळखून ग्रामस्थांनी संबंधित मद्यविक्रेत्यांना ‘गावात मद्यविक्री करू नये’, असे सांगितले होते. तरीही व्यावसायिक ऐकत नसल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली, तरीही गावात मद्यविक्री चालूच होती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या साहाय्याने मद्यविक्रीवर कारवाई करण्याचा निश्चय केला. त्यानुसार ग्रामस्थांनी पाळत ठेवून मद्यविक्रेता ३० मार्चला गाडीतून मद्य आणत असल्याचे समजल्यावर पोलिसांना माहिती दिली, तसेच पोलीस येईपर्यंत मद्यविक्रेत्याची गाडी अडवून धरली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मद्यविक्रेत्याच्या घरी पडताळणी केली असता मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा सापडला. हा साठा पोलिसांनी कह्यात घेतला आहे.
संपादकीय भूमिकाअवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? अवैध कृत्यांच्या विरोधात जनतेलाच संघटित होऊन आवाज उठवावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! |