गोवा : राज्यात ५ दिवसांत बलात्काराची ५ प्रकरणे नोंद
बहुतांश प्रकरणांमध्ये संशयिताने विवाहाचे आमीष दाखवून केला बलात्कार !
पणजी, ३१ मार्च (वार्ता.) : राज्यात ५ दिवसांत बलात्काराची ५ प्रकरणे नोंद झालेली आहेत. यामधील बहुतांश प्रकरणांमध्ये संशयिताने पीडितांना विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचे उघड झाले आहे, तसेच पोलिसांनीही बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपींना अजूनही कह्यात घेतलेले नाही.
२७ मार्च या दिवशी पणजी महिला पोलीस ठाण्यात बलात्काराचे पहिले प्रकरण नोंद झाले. यामध्ये संशयिताने पीडितेला लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केले. संशयिताने पीडितेला मारहाण केली आणि शिवीगाळही केली. या प्रकरणी आरोपीला अजूनही कह्यात घेण्यात आलेले नाही. याच दिवशी महिला पोलिसांनी अशाच प्रकारे अन्य एक बलात्काराचे प्रकरण नोंद केले. २८ मार्च या दिवशी एका १७ वर्षीय युवतीने तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली. या प्रकरणी तक्रारदाराने तिला बळजोरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. २९ मार्च या दिवशी १६ वर्षीय युवती गर्भवती असल्याचे उघड झाले होते. ही युवती १० जानेवारी या दिवशी खांडोळा येथील जत्रेतून घरी परतत असतांना तिच्यावर २ अज्ञातांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ३० मार्च या दिवशी बलात्काराचे अन्य एक प्रकरण नोंद झाले. या प्रकरणी संशयिताने प्रथम लग्न करण्याचे आमीष दाखवले आणि नंतर लग्नास नकार दर्शवला. संशयिताने पीडितेकडून ३ लाख रुपये रोख रक्कम घेतली आणि पैसे परत केले नाहीत. लग्नाचे आश्वासन दिल्याची आठवण केल्यावर संशयिताने पीडितेला शिवीगाळ करून मारहाण केली.