भोजन

‘भोजन म्हणजे यज्ञकर्म आहे’ (‘उदरभरण नोहे जाणिजेयज्ञकर्म ।’) , याची जाणीवच नाहीशी झाली आहे. केवळ म्हणण्यापुरतेच शिल्लक आहे. भोजनातील यज्ञाची कल्पना माहीत नसल्याने भोजन, म्हणजे भोगच समजला जातो; परंतु हे योग्य नाही. भोजनाच्या वेळी मन प्रसन्न होईल, असे वातावरण असावे. भोजन सात्त्विक आणि पवित्र असावे; कारण भोजन करतांना आपण एकटे नसतो. ‘आपल्या आत एक महान शक्ती बसलेली आहे. तिला आपल्याला संतुष्ट करायचे आहे’, असा भाव भोजन करतांना असावा लागतो. गीता सांगते,

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्लोक १४

अर्थ : मीच सर्व प्राण्यांच्या शरिरात रहाणारा, प्राण आणि अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो. (खादित (भोज्य – चावून खातो ते), पीत (पेय – पितो ते), लीढ (लेह्य – चाटूत खातो ते) आणि अशित (चोष्य – चोखून खातो ते) हे अन्नाचे चार प्रकार आहेत.)

भगवंत प्राण-अपान रूप धारण करून वैश्वानर रूपाने आपण जे खातो, ते पचवतो. भोजन करतांना हा भाव सतत लक्षात ठेवायला पाहिजे. त्यासाठी स्वच्छता आणि पावित्र्य हवे. मी सामान्य असेन; पण माझ्या शरिरात या विश्वाला हलवणारी महान शक्ती आहे; म्हणून मी हीन, दीन, लाचार असूच शकत नाही.

(साभार : ग्रंथ ‘भारतियांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)