जीवन दुःखी करणारा महाभयंकर रोग ‘अहंकार’ !
‘प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास असू शकतात. काही जणांना शारीरिक, काही जणांना मानसिक, तर काही जणांना आध्यात्मिक त्रास असतात. शारीरिक त्रासांचे निराकरण वैद्यांच्या औषधांनी होऊ शकते. मानसिक व्याधी औषधे आणि आध्यात्मिक उपाय यांमुळे बर्या होऊ शकतात. आध्यात्मिक त्रास संतांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना केल्यावर दूर होतात; पण या तिन्ही त्रासांव्यतिरिक्त फार मोठी व्याधी मानवाला झाली आहे, ती म्हणजे अहंकार !
‘अहंकार कसा वाढतो ?’, ‘त्याचा सर्वसाधारण जीवनावर, साधनेवर दुष्परिणाम कसा होतो ?’, ‘अहंकारावर मात करण्याची आवश्यकता आणि मात करण्याचे उपाय’, या सर्व गोष्टींचा परामर्श या लेखात घेतला आहे.
१. अहंकार कसा निर्माण होतो ?
१ अ. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचेच विचार योग्य वाटत असल्यामुळे ‘मी करतो, ते योग्य’, असे वाटून ‘मी‘ची जोपासना केली जाणे : जीवन जगतांना सभोवतालच्या परिस्थितीनुसार आपल्या मनात सतत योग्य-अयोग्य विचार येत असतात. याविषयी आपण कुणाचेच मार्गदर्शन घेत नाही. आपण आपल्या मनाला जे योग्य वाटेल, तसे वागतो. एखादी योग्य कृती केल्यावर ‘माझ्यामुळेच हे झाले’, असे वाटून ‘मीच करतो’, ‘मला वाटते, ते योग्यच आहे’, ‘मला कळते’, अशा भ्रमात राहून आपण ‘मी’ला जोपासतो आणि आपणच आपल्या मनावर ‘मी’पणाचा संस्कार करून घेतो. हा ‘मी’, म्हणजेच अहंकार !
१ आ. बहुसंख्य जीव साधना करत नसल्यामुळे त्यांच्या मनात ‘मी ईश्वराचा अंश आहे’, हा विचार नसणे, मनात येणारे ‘मी’चे विचार हाच अहंकार असणे : बहुसंख्य जीव साधना करत नसल्यामुळे ‘मी’ परमात्म्याचा अंश आहे’, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही; याउलट ‘मी परमात्म्यापासून वेगळा आहे’, अशी कल्पना त्यांच्या मनात रुजते. हाच अहंकार !
२. मनासारखे न झाल्यावर अहंकाराचे प्रकटीकरण होणे
आपल्या मनासारखे झाल्यावर आपले मन, म्हणजेच अहंकार सुखावतो; याउलट एखाद्या व्यक्तीमुळे आपली अपेक्षा, इच्छा पूर्ण होत नाही, तिला आपण ओरडतो, रागावतो किंवा नावे ठेवतो. हेच अहंकाराचे प्रकटीकरण आहे. आपल्या जीवनामध्ये मनाविरुद्ध होणारे प्रसंग बहुतांशी आपल्या अहंकारामुळे होतात.
आपण आतापर्यंत घेतलेल्या अनेकानेक जन्मांमध्ये आपला अहंकार वाढतच गेला आहे; कारण अहंकार घालवण्यासाठी आपण प्रयत्नच केले नाहीत किंवा ते अल्प पडले.
३. अहंकारामुळे होणारे दुष्परिणाम !
३ अ. कर्तेपणा वाढणे : अहंकारामुळे आपण करत असलेल्या ‘प्रत्येक कृतीचा कर्ता मीच आहे’, असे आपल्याला वाटते. त्यामुळे ‘मीच करतो’, ‘मला कळते’, आणि ‘मी म्हणतो, तेच योग्य आहे’, अशा प्रकारचे अहंकाराचे पैलू दृढ होतात.
३ आ. अहंकारामुळेच परिस्थिती स्वीकारता न येऊन प्रतिक्रिया दिल्या जाणे, त्यामुळे व्यक्तीकडून होणार्या चुका वाढणे : आपल्या अहंकारामुळे आपण समोरच्या व्यक्तीची कुठलीही गोष्ट स्वीकारत नाही. तिचे म्हणणे ऐकून घेत नाही किंवा ती बोलत असतांना प्रतिक्रिया व्यक्त करतो. तिचे बोलणे खोडून काढतो आणि ‘मी कसा योग्य आहे ?’, ते सांगतो. समोरची व्यक्ती गप्प बसल्यावर आपल्याला वाटते, ‘मी जिंकलो. मी तिला गप्प बसवले’; पण प्रत्यक्षात ‘आपणच हरलो आहे’, हे आपल्या लक्षात येत नाही. या अहंच्या कवचामुळे पुढे प्रत्येक गोष्टीतच आपण चुकीचा विचार करू लागतो. यामुळे आपल्या चुका वाढून आपले देवाण-घेवाण आणि पापकर्म वाढते.
३ इ. अहंकारी व्यक्तीचे वागणे-बोलणे यांमुळे तिच्यामधील इतर गुणांची वजाबाकी होऊन शेवटी ती व्यक्ती दुःखी होणे : अहंकारामुळे व्यक्ती आत्मकेंद्रित होऊन प्रत्येक कृती स्वतःच्या दृष्टीकोनातून आणि स्वतःसाठीच करते. त्यातून स्वार्थ बळावतो. अहंकारी व्यक्ती कुणाचे काही ऐकून घेण्याच्या स्थितीत नसते, तसेच इतर व्यक्तींशी बोलतांना त्यात समोरच्या व्यक्तीविषयी प्रेम किंवा आदरभावना नसते; याउलट तिचे बोलणे इतरांना क्लेश देणारे असते. त्यामुळे समाज तिला टाळतो. अहंकारी व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असले, तरी अहंकारामुळे त्या गुणांची वजाबाकी होते. अहंकारी वागण्यामुळे तिच्याकडून अनेक चुका होऊन शेवटी ती व्यक्ती दु:खी होते; पण ‘अहंकारामुळे दुःख होते’, हे तिला अनेक जन्मांच्या साधनेनंतर कळते.
३ ई. मनाविरुद्ध घडणार्या प्रसंगात दुःख होऊन मनोविकार बळावणे आणि वाईट कृत्येही घडणे : मनाविरुद्ध घडणार्या प्रसंगांमुळे व्यक्ती दुःखी होते आणि कधी कधी मानसिक रुग्णही होते. हे दुःख सहन न झाल्यामुळे अशा व्यक्तींचे आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढते. अहंकार हे एक मोठे विष आहे. याची माणसाला एकदा लागण झाली की, हळूहळू ते विष त्या व्यक्तीच्या पूर्ण मन आणि बुद्धी यांत पसरते आणि व्यक्तीचे मन विषारी, कलुषित होते. त्या व्यक्तीचे वागणेही टोकाच्या वाईटपणाकडे जाण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे त्या व्यक्तीचे बोलणे-वागणे यातून बाहेर पडणारी स्पंदने अत्यंत वाईट असतात. असे लोक वाईट कृत्ये करायलाही मागे हटत नाहीत.
४. अहंकारावर मात करण्याची आवश्यकता !
४ अ. अहंकार अल्प झाल्यास मनावरील ताण अल्प होणे : अहंकार अल्प झाला, तर आपल्या जीवनातील ताण बर्याच प्रमाणात न्यून होतो. मेंदूवर, मनावर असलेला ताण अल्प झाल्यावर आपली विचारप्रक्रिया सकारात्मक दृष्टीने व्हायला लागते.
४ आ. अहंकारामुळे दुःख होणे आणि इतरांनाही दुःख दिले जाणे; म्हणून अहंकार घालवण्यासाठी कठोरपणे मनाला शिक्षा करावी लागणे : प्रत्येक व्यक्तीमध्ये अहंकार असतोच. अहंकारामुळे इतरांना दुखावले जाऊन स्वतःचे आणि समोरच्याचे जीवन व्यथित होते, दुःखमय होते अन् काही वेळा उद्ध्वस्तही होते. अहंकार सहजासहजी जात नाही. त्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. स्वतःच्या मनाला शिक्षा द्यावी लागते, फटके द्यावे लागतात, तरच ते ऐकण्यास सिद्ध होते.
४ इ. ‘साधनेत अहंकार नष्ट करायचा असतो’, याविषयी समाज अनभिज्ञ असणे : समाजातील बहुतांश लोक साधनेविषयी अज्ञानी असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अहं जोपासला जातो. त्यांच्या आयुष्यामध्ये ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे अत्युच्च कोटीचे गुरु आलेले नसतात. त्यामुळे सर्वसामान्य लोक साधना करतात, तेव्हा ‘त्यांना आपला अहंकार नष्ट करायचा आहे’, याची जाणीव नसते. त्यामुळे साधना करूनही ते आनंदाच्या स्तराला पोचू शकत नाहीत. शारीरिक आणि मानसिक व्याधींवर त्या- त्या विषयातील तज्ञांकडून आपण औषधांच्या गोळ्या घेतो, तशी अहंकार घालवण्यासाठी गोळी नाही.
५. अहंकार अल्प करण्याचे प्रभावी उपाय !
५ अ. मनमोकळेपणाने बोलणे : अहंकार अल्प करण्यासाठी मनमोकळेपणाने बोलणे हे अत्यंत लाभदायक ठरते. जेवढे आपण मनमोकळेपणाने बोलू, तेवढे मनात असणारे विचार शीघ्र गतीने अल्प होतात. मनावर असलेल्या अनेक विचारांचा ताण अल्प होतो आणि मनातील ती जागा रिक्त होते. त्यामुळे आपल्याला हलके वाटते.
५ आ. शांतपणे प्रश्न हाताळणे : वाद करून, भांडून किंवा गार्हाणे करून प्रश्न सुटत नाहीत. ‘शांतपणे आणि संयमाने प्रश्न हाताळणे’, हा अहंकारावर मात करण्याचा एक मार्ग आहे. याचा संस्कार आपल्या मनावर झाला, तर कुठलाही अवघड प्रश्न आपण शांतपणे हाताळू शकतो आणि त्यातून आपली साधना होऊ शकते.
५ इ. ऐकणे, स्वीकारणे, विचारणे आणि कृती करणे या चतुःसूत्रीचे पालन करणे : समोरची व्यक्ती काही सांगत असते, तेव्हा ‘तिचे बोलणे पूर्णपणे ऐकणे, ते मनापासून स्वीकारणे, त्याविषयी विचारून घेणे आणि त्याप्रमाणे कृती करणे’, या चतुःसूत्रीचे पालन केले, तरी आपल्या मनामध्ये असणारा अहंकाराचा दृढ संस्कार हळूहळू अल्प होईल. आपल्याला सर्व गोष्टी परेच्छेने करता येऊ लागतील. ‘सतत स्वीकारण्याच्या स्थितीत राहिल्यावर आपल्या मनामध्ये ‘मी’पणाच रहाणार नाही.
५ ई. ‘ईश्वराच्या इच्छेविना झाडाचे पानही हालत नाही’, हे लक्षात येऊन अहं न्यून होणे : ‘या सृष्टीतील झाडाचे पानही परमेश्वराच्या इच्छेविना हालत नाही, तिथे ‘मी काही करू शकणे शक्यच नाही.’ आपण कठपुतलीसारख्या बाहुल्या आहोत’, याचा अनुभव आपल्याला येतो. शेवटी ‘सर्व देवाच्या इच्छेने होते’, हे लक्षात येते. त्यामुळे हळूहळू ईश्वरी इच्छा समजून परमात्म्याकडे म्हणजेच साधनेच्या दृष्टीने पुढचे सकारात्मक पाऊल टाकणे शक्य होते. ‘प्रत्येक गोष्ट देव करून घेतो’, असा संस्कार मनावर झाल्यावर अहं अल्प व्हायला वेळ लागत नाही.
५ उ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनप्रक्रियेच्या अंतर्गत सारणी लिखाण आणि सूचनासत्रे करणे : जीवनात प्रतिदिन अनेक प्रसंग मनाविरुद्ध घडतात. ते प्रसंग स्वीकारण्याचा संस्कार मनावर करण्यासाठी अंतर्मुख राहून घडलेल्या प्रसंगात स्वतःच्या चुकांचे निरीक्षण आणि चिंतन केल्यास स्वतःमधील स्वभावदोष अन् अहं यांच्या पैलूंची जाणीव होईल. हे प्रसंग प्रतिदिन सारणीत लिहिले पाहिजेत. आपल्यातील कुठल्या स्वभावदोषामुळे तो प्रसंग घडला, तो स्वभावदोष लिहून त्यापुढे योग्य दृष्टीकोनाची सूचना लिहावी. ती सूचना दिवसभरात १० – १२ वेळा मनाला दिल्यावर अंतर्मनातील तो स्वभावदोष निघून जायला साहाय्य होईल. ‘मनाविरुद्ध घडणारा प्रसंग किती वेळ आपल्या मनाला त्रास देतो’, हे लक्षात आले, तर तशा सूचना मनाला देता येतात. त्यामुळे अंतर्मनाची प्रक्रिया शीघ्र गतीने होते. पुढे तशाच प्रकारच्या घडणार्या प्रसंगात आपण सावध होऊन वागतो. त्यामुळे अहं अल्प व्हायला साहाय्य होते.
५ ऊ. गुरूंच्या संकल्पाने अहं-निर्मूलन होणे : अहंकार घालवण्यासाठी योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्यावर मात करता येणे शक्य होते. ‘स्थुलातून आपण कितीही प्रयत्न केले, तरी गुरूंचा संकल्प असेल, तरच अहंकार अल्प होतो; म्हणून ‘गुरूंचे मन जिंकणे’ हा त्यावरचा एकमेव मार्ग आहे. अन्यथा आपण कितीही प्रयत्न केले, तरी अहंकार जात नाही’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या मागे प.पू. डॉक्टरांचा (परात्पर गुरू डॉ. आठवले यांचा) संकल्प आहे. त्यामुळे तेच प्रयत्न करून घेतात आणि त्यात यशही देतात.
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनातून मिळणारा आनंद काही वेगळाच आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने जे अनुभवता आले, ते त्यांनीच लिहून घेतले. ते त्यांच्या पवित्र आणि कोमल चरणी अर्पण !’
– चरणसेवक
श्री. मधुसूदन कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (२२.४.२०२२)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |