छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापिठातील वसतीगृहात प्राथमिक सुविधांची वानवा, विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष !
छत्रपती संभाजीनगर – मुलींसाठी वसतीगृहात बसवण्यात आलेल्या ‘सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन’ बंद आहेत. काही वसतीगृहात तर ते नाहीच. पिण्याच्या पाण्याच्या समस्याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. वारंवार सांगूनही लक्ष न दिल्याने मध्यरात्री ‘मातोश्री विद्यार्थिनी वसतीगृहा’तील विद्यार्थिनी कुलगुरूंच्या निवासस्थानी गेल्या; परंतु अडीच घंटे विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. रात्री विलंबाने कुलगुरु आल्यावर त्यांनी ‘सकाळी येऊन पहातो’, असे आश्वासन दिल्यावर विद्यार्थिनी वसतीगृहात परतल्या. दुसर्या दिवशी दुपारी १.३० पर्यंत पाणी नव्हते. विद्यार्थिनींनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात २७ विहिरी आणि बारवा आहेत. यातील ८ ते १० विहिरींतील पाण्याचा वापर विद्यापीठ प्रशासन करत आहे. विविध विभागांत १८ आर्.ओ.प्लांट बसवले आहेत. तरीही विद्यापिठात पाण्याची समस्या कायम असून मनपाकडून मिळणार्या रोजच्या एक घंट्याच्या पाण्यासाठी वार्षिक २ लाख ७० सहस्र रुपये मोजावे लागतात.
स्वच्छतागृहे तुंबल्यामुळे विद्यार्थ्यांना जावे लागते बाहेर !
सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्याची समस्या फक्त मुलींच्याच नाही, तर मुलांच्याही वसतीगृहात आहे. येथे केवळ पाणीच नाही, तर मेसही नाही आणि स्वच्छताही नाही. स्वच्छतागृह तुंबल्यामुळे काही मुले बाहेरही जातात. वसतीगृहात ‘वायफाय’ची सुविधा नाही.
संपादकीय भूमिका :वसतीगृहामध्ये प्राथमिक सुविधांची वानवा असणे, हे संतापजनक आहे. याकडे दुर्लक्ष करणार्या असंवेदनशील अधिकार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |