सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी १२ आतंकवाद्यांना वाचवण्याचे काम केले ! – राम सातपुते, भाजपचे सोलापूर येथील उमेदवार
सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री असतांना सुशीलकुमार शिंदे यांनी आतंकवाद प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या सोलापूरमधील १२ आतंकवाद्यांना वाचवत तुष्टीकरणाचे राजकारण केले, असा आरोप सातपुते यांनी केला आहे. या १२ अतिरेक्यांना सोडून देण्याचे काम त्यांनी केले असून, ‘हवी तर या सर्वांच्या नावांची सूची मी देतो’, असेही ते म्हणाले. (सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील आरोप गंभीर असून सातपुते याविषयी पुरावे पोलिसांना देणार का ? – संपादक) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा येथे भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार सातपुते बोलत होते. ‘सोलापूरसाठी शिंदे यांनी तुम्ही काय केले ?’, असा प्रश्न करत सोलापूर भकास करून दक्षिण आफ्रिका आणि अन्य ठिकाणी स्वतःचे चहाचे विकत घेतले’, असा आरोपही राम सातपुते यांनी केला आहे.
हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणायचे धाडस सुशीलकुमार शिंदे यांनी केले !
सातपुते पुढे म्हणाले की, महिन्यातून २ दिवस मतदारसंघात यायचे आणि एकदा छायाचित्र काढायचे. तेच छायाचित्र तिकडे १५ दिवस दाखवत भेटी दिल्याचे दाखवण्याचे काम ताईने (प्रणिती शिंदे) केले आहे. असले धंदे मी करीत नाही, अशा शब्दात त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आजवर ७० वर्षांत कुणी हिंदूंना आतंकवादी म्हणायचे धाडस केले नव्हते, ते या सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ते ‘सोलापूरचे कलंक’ असल्याचा घणाघातही आमदार राम सातपुते यांनी केला.