आज भुजबळांवरील आरोपांविषयी परत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी !
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण !
मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती; परंतु या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिनांक मिळत नव्हता. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १ एप्रिल या दिवशी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज केल्यानंतर त्यांना दोषमुक्त करण्यात आले होते. याविषयी अंजली दमानिया यांनी आव्हान देणार्या अर्जावर दीड वर्ष सुनावणी होत नव्हती. विविध कंत्राटांतून भुजबळ कुटुंबियांच्या आस्थापनांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरूपात मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात हे गुन्हे नोंद आहेत. अंमलबजावणी संचालनालयानेही त्यांच्यावर काळ्या पैशांच्या संदर्भात २ गुन्हे नोंद केले होते.